नवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी राजीनामा दिला आहे. उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यानंतर डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी राजीनामा दिल्यानंतर खळबळ उडाली आहे. राजीनामा देण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. विरल आचार्य यांचा कार्यकाळ संपायला सहा महिन्याचा अवधी शिल्लक होता. उर्जित पटेल नंतर विरल आचार्य यांच्या राजीनाम्याने चर्चेला उधान आले आहे.
जानेवारी २०१७ मध्ये आचार्य आरबीआयमध्ये रुजू झाले होते. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षाचा होता. कार्यकाळ संपण्याअगोदर त्यांनी आपला राजीनामा सादर केला आहे. आचार्य हे उर्जित पटेल यांच्या टीम मधील महत्वाचे घटक मानले जात होते. उर्जित पटेल यांच्यानंतर सरकारने आरबीआयच्या गव्हर्नर पदी शक्तीकांत दास यांची निवड केली होती. शक्तीकांत दास आणि आचार्य यांच्या मतांमध्ये बरेच अंतर दिसून येत होते. मागे झालेल्या काही बैठकीमध्ये महागाई आणि विकास दर या मुद्द्यावरून दोघांचे मतभेद समोर आले होते.
आचार्य हे न्यूयॉर्क विद्यापीठात अध्यापनाचे काम करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. आरबीआयचे वरिष्ठ डेप्युटी गव्हर्नर एन. विश्वनाथन यांचा कार्यकाळदेखील लवकरच संपणार आहे. आचार्य यांनी अचानक राजीनामा दिल्या नंतर त्यांचा कार्यकाळ वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अतिशय कमी वयात आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर होण्याचा मान विरल यांना मिळाला. रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता राखणं गरजेचं असल्याचे मत त्यांनी गेल्या वर्षी व्यक्त केलं होतं. त्यामुळे ते चर्चेत आले होते.