नवी दिल्ली : आरबीआयने आज गुरुवारी आर्थिक पतधोरण जाहीर केले. आरबीआयने व्याज दरात कोणताही बदल केलेला नाही. आरबीआयने रेपो तसेच रिव्हर्स रेपोरेट ‘जैसे थेच’ ठेवले आहे. त्यामुळे कर्जदारांना किंवा नवीन कर्ज घेण्याच्या तयारीत असणाऱ्या ग्राहकांना स्वस्त कर्जासाठी अजून वाट पाहावी लागणार आहे. व्याज दर कायम ठेवल्याने शेअर बाजारात निराशाचे वातावरण असल्याची शक्यता आहे.
रेपो दर ५.१५ टक्के तर, रिव्हर्स रेपो दर ४.९०% टक्के कायम ठेवला. तर सीआरआर 4 टक्के आणि एसएलआर 18.5 टक्के इतका ठेवला आहे. याशिवाय, आरबीआयने आर्थिक वर्षात (2020-21) विकास दर 6 टक्के राहील असा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, रिझर्व्ह बॅंकेने डिसेंबरमधील पतधोरणाआधी सलग पाचवेळा बँकेने रेपो दरात कपात केली होती. मात्र, बँकांनी व्याजदर कपातीला फारसा प्रतिसाद दिला नाही.
रेपो रेट म्हणजे आरबीआय ज्या व्याज दराने बँकांना कर्ज देते तो दर तर रिव्हर्स रेपो रेट म्हणजे ज्या व्याज दराने बँका रिझर्व बँकेकडे ठेवी ठेवतात तो दर. रेपो रेट वाढविले किंवा कमी केले तर बँकांना दिल्या जाणाऱ्या व्याज दरात वाढ किंवा कपात होत असते.