आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरसाठी जाहिरात

0

नवी दिल्ली। केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) डेप्युटी गव्हर्नर पदासाठी प्रथमच जाहिरात दिली आहे. या पदासाठी बँकिंग आणि अर्थविषयक बाजारपेठेचा अनुभव असणारे संचालक आणि सल्लागार अर्ज करू शकतात, असे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्याप्रमाणे बँकिंग आणि अर्थविषयक बाजारपेठेचा 15 वर्षांचा अनुभव असणार्‍या व्यक्तीकडून या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

त्यामध्ये अर्जदार कोणत्याही अर्थविषयक संस्थेचा पूर्णवेळ संचालक असणेही आवश्यक आहे. या जाहिरातीनुसार रिझर्व्ह बँकेत प्रथमच खासगी क्षेत्रातील डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्त होण्याची शक्यता आहे. डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंद्रा यांचा कार्यकाळ येत्या जुलैमध्ये संपुष्टात येत आहे. त्यांची रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली आहे. जाहिरातीनुसार अर्जधारक अर्थविषयक संस्थेत वरिष्ठ पदावर कार्यरत असावा, संबंधिताला अर्थविषयक बाजारपेठेचे पूर्ण ज्ञान असावे, याशिवाय सरकारी धोरणांचा अभ्यास आणि चांगले संवादकौशल्य असणे आवश्यक असावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अर्जधारकाचे वय 31 जुलै 2017 रोजी साठ वर्षांपेक्षा कमी असावे, असेही जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे. मात्र, उमेदवार अधिक लायक असेल, तर वयोमर्यादेत सवलत देण्यात येईल, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. या पदावर नियुक्त होणार्‍या व्यक्तीला दरमहा दोन लाख 25 हजार रुपये वेतन देण्यात येईल, असे म्हटले आहे. नियुक्ती तीन वर्षांसाठी असून, त्यात वाढही होऊ शकते, असे नमूद करण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2017 आहे.