आराखड्यातील विकासकामांत नियमांना बगल

0

फैजपूर । शहरात 2016-17 मध्ये करण्यात आलेल्या विविध विकासकामांच्या आराखड्यातील काँक्रीटीकरण, खडीकरण, डांबरीकरण ही कामे संबंधित ठेकेदाराने अंदाजपत्रकानुसार न करता निकृष्ट दर्जाचे केले आहे. या कामांमध्ये नियमांचे उल्लंघण केल्याने या कामांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाईची मागणी गटनेता कलिमखा मन्यार यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्याधिकार्‍यांना निवेदन दिले होते. सद्यस्थितीत या आराखड्यांतर्गत झालेल्या सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाल्याने याची पालिका प्रशासनाने गंभीर दखल घेऊन चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

सखोल चौकशी करण्याची केली जातेय मागणी
नगरपालिकेच्या 2016-17 विकास कामाच्या आराखड्यात समाविष्ट असलेल्या विकास कामांमध्ये काँक्रीटीकरण, खडीकरण, डांबरीकरण करतांना नियमांचा भंग करण्यात आला. शासनाच्या वैशिष्ट्य पूर्ण योजनेंतर्गत सन 1946 चे संकल्प चित्राचे कामातदेखील नियमांचे भंग झाला. नगरपालिका प्रशासनाकडून सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

या परिसरात झालेल्या कामांची व्हावी चौकशी
या मागण्याविषयी गटनेता कलिम खां मन्यार यांनी 11 मे रोजी मुख्याधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती व फैजपूर पालिकेच्या विकास आराखड्यामधील लक्कडपेठ, पिंजारवाडा, मन्यारवाडा, माजी नगराध्यक्ष पी.के.चौधरी यांच्या घराजवळील असे काँक्रिटीकरण व आसाराम नगर, सुरेश बणाईत यांचे घराजवळ, पोलीस पाटील यांचे विहिरीचा रस्ता, लक्ष्मी नगर या रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण ही कामे तर मिल्लत नगरमधील कब्रस्तानजवळ गटारीचा विषयसुद्धा प्रलंबित असल्याचा कलीमखा मन्यार यांनी उल्लेख करून त्यांनी झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करून पालिका अभियंत्याने दिलेल्या नियमांचा व शर्ती अटींचा भंग केला आहे म्हणून या ठेकेदाराविरुद्ध कारवाई करण्यात यावी व त्याचा परवाना काळ्या यादीत टाकावा, अशी त्यांनी मागणी केली आहे. याविषयी मुख्याधिकार्‍यांनी या ठेकेदाराला एका रस्त्याच्या निकृष्ठ कामाविषयी नोटीस दिली आहे. वर नमूद रस्त्यांची चार महिन्यात दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांच्या कामांवर शासनाचा जवळपास 90 लाखांचा निधी खर्च केल्याने या रस्त्यांच्या कामांवर खर्च झालेला निधी वाया गेल्याचा आरोप आहे.

आपण केलेल्या तक्रारीची वेळीच दखल घेतली गेली असती तर असे निकृष्ट दर्जाचे काम झाले नसते मात्र निकृष्ट दर्जाचे काम करणार्‍या या ठेकेदाराच्या रस्त्यांचे कामांची उच्चस्तरीय चौकशी करून या ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्याचा परवाना काळ्या यादीत टाकण्यात यावा.
– कलीम खा मन्यार, गटनेता