आराध्यासाठी माणुसकीचा लढा!

0

आराध्या… एक पावणे चार वर्षांची चिमुरडी. नवी मुंबईच्या कळंबोलीत आपले बाबा योगेश आणि आई प्रतिभा यांच्यासोबत मस्त जगत असलेली. या नकळत्या वयातील मुलं जशी मस्त धम्माल करतात तशीच. कुणालाही भावणारी. गोड तर अशी की कुणाच्याही हृदयात आपुलकीचं स्थान मिळवणारी…मात्र, स्वत:च्या चिमुकल्या हृदयात मोठं दुखणं घेऊन जगणारी! तिचे बाबा योगेश माझ्याशी बोलताना आराध्याविषयी सांगत होते तेव्हा माझ्यातील परीचा बाबा हेलावत होता. या चिमुरड्या कळीला अजून उमलायचे आहे. फुलायचे आहे. जग पाहायचे. खूप काही करायचे आहे. जगायचे आहेच आहे. त्यामुळेच तिच्या बाबांचा…आईचा…आराध्यासाठीचा लढा हा स्वत:चा लढा मानलाच पाहिजे असे ठरवले.

आराध्याची माहिती मिळाली ती माझे मित्र संतोष आंधळे यांच्याकडून. त्यांनी आराध्यासाठी त्यांच्या पातळीवर लढाच पुकारला आहे. माझ्या सहकारी मनीषा मिठबावकर यांनी आराध्यावर एक बातमी लिहिली. त्यात भावना ओतलेल्या होत्या. पान दाखवताना त्या बोलल्या, सर, आपण काही तरी केलंच पाहिजे. त्याचवेळी डोक्यात लढा स्तंभाच्या विषयावर विचार सुरू होता. ठरवलं यावेळी आराध्याचा जगण्यासाठीचा, तिच्या आई-बाबांचा आपल्या लेकीला वाचवण्यासाठीचा लढा मांडायचा.

नवी मुंबईतील कळंबोलीत राहणार्‍या योगेश आणि प्रतिभा मुळ्ये या दाम्पत्याची आराध्या ही लाडकी लेक. अगदी कोणत्याही आई-बाबांसाठी आपली चिमुकली लेक परीराणीच असते तसंच आराध्याही त्यांच्यासाठी स्वाभाविकच आहे. गेल्यावर्षी 5 मार्चला तिचा वाढदिवस मस्त साजरा झाला. घरात अगदी आनंदोत्सवाला उधाण आलं होतं. त्यानंतर काही दिवसांतच तिला मूत्रमार्गात जंतूसंसर्ग झाला. तिच्यावर उपचारही झाले. ती बरी झाली.

8 एप्रिलला गुढीपाडवा होता. गुढीपाडवा म्हटलं की मराठी घरांमध्ये वेगळीच मंगलमय लगबग असते. नव्या वर्षाचा नवा उत्साह संचारतो. मुळ्ये कुटुंबातही तसंच असावं. सारे त्या उत्साहात मग्न असावे. तेवढ्यात आराध्यानं उलटी केली. तसंच पोटात दुखत असल्याची तक्रारही. सकाळी दहालाच तिला बालरोगतज्ज्ञांकडे नेण्यात आलं. त्यांनी तिला तपासले. हृदयाच्या ठोक्यांचा वेग जास्त होता. जास्त म्हणजे खूपच जास्त. नेहमीपेक्षा खूपच. तो 180पेक्षाही जास्त होता! धोक्याचे पहिले संकेत तेथे मिळाले. आराध्याला तत्काळ अतिदक्षता कक्षात नेऊन तपासणी सुरू करण्यात आली. हृदयविकारतज्ज्ञ आले त्यांनी तपासले. निदान झाले. ऊळश्ररींशव उरीवळेाूेरिींहू हा विकार. तोही अखेरच्या टप्प्यातील!

आराध्याच्या आई-बाबांवर तर जणू आभाळच कोसळलं असावं. पण कौतुक वाटतं त्यांचं. मन घट्ट करून त्यांनी निर्धार केला. आपल्या आराध्याला वाचवण्यासाठी वाट्टेल ते करायचं. काहीही करावं लागलं तरी चालेल. आराध्याच्या बाबांनी महेंद्रा ऑटोमोबाइलमधील सुखाची नोकरी सोडून स्वत:चा कन्सल्टंसीचा व्यवसाय सुरू केला आहे. अवघे काही दिवस झाले होते. पण लेकीसाठी त्यांनी सारं सोडलं. फक्त एकच मिशन आराध्याला वाचवण्याचा लढा!

डॉक्टरांनी आराध्यावर औषधोपचारानं विकार बरा करायचा प्रयत्न केला. पण सहा महिन्यांतील तीन महिने वेगवेगळ्या रुग्णालयांच्या अतिदक्षता कक्षात काढल्यानंतर तिच्या आई-बाबांनी ठरवलं आता वेळ नाही घालवायचा. हृदय प्रत्यारोपण करायचे. ऑक्टोबरमध्ये तिचे नाव नोंदवण्यात आले. तेथून सुरू झाला लढ्याचाच पुढचा टप्पा.

आराध्याला वाचवण्यासाठीच्या लढ्यातील हा टप्पा अधिक अवघड असा. आपल्याकडे दानाला कितीही महत्त्व असले, तरी लोक अवयवदान करत नाहीत. आजही विनाकारण लोकांच्या मनात फालतू शंका-कुशंका आहे. आहे तेच जीवन नरकासमान जगतात, पण काळजी पुढच्या जन्माची करतात. अवयवदान केले तर पुढच्या जन्मात तो अवयव मिळणार नाही यापासून संपूर्ण शरीराचे दहन केले नाही तर मुक्ती कशी मिळणार वगैरे वगैरे अनेक लज्जास्पद समज करून दिलेले, करून घेतलेले आढळतात. ज्या देशात शुश्रूषाने शस्त्रक्रियेचे पहिले विज्ञान विकसित केले, त्या देशात हे गैरसमज लाज आणणारेच तसेच त्यामुळेच पाश्‍चात्त्य देशांमध्ये हजारांमध्ये तीन लोक अवयवदान करतात तर दान महिमा पुण्यसंचयासाठी करण्याची परंपरा असलेल्या आपल्या देशात दहा लाखांमध्ये फक्त एकच माणूस अवयवदान करतो.

महाराष्ट्राचं सांगायचं तर 2016मध्ये फक्त 132 अवयवदान झालेत. त्याबाबतीत तामीळनाडू आपल्या खूप पुढे आहे. अर्थात हे झाले तेही वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. गिरीश महाजन या उत्साही मंत्र्यामुळे! गिरीशभाऊंनी अवयवदानाची गरज ओळखून मोहीमच राबवली. नोकरशाहीला खडबडून जागे केले. जे चांगले होते त्यांना प्रोत्साहन दिले. खासगी सहकार्यातून मोहीम राबवल्याने 2015चा 57चा आकडा दुपटीच्याही पुढे गेला. आता आणखी पुढे जात आहे. मात्र, ते पुरेसे नाही. देशात आराध्यासारखे पाच हजार गरजू असतात, ज्यांचे प्राण हृदयदानाने वाचवले जाऊ शकतात. पण मिळतात फक्त शंभरच! दृष्टिदानाचे पुण्यही वेगळेच. जे.जे. रुग्णालयाचे डॉ. तात्याराव लहानेे, डॉ. रागिणी पारेख ही दोघे आपल्या टीमला सोबत घेऊन चांद्यापासून बांद्यापर्यंत दृष्टीयज्ञाची मोहीमच राबवतात. अहर्निश अशी. त्यांच्याशी बोलताना मिळणारी माहिती धक्कादायक असते. देशातील दृष्टी पटलांची…कार्नियांची आवश्यकता सव्वा लाखांची असताना जेमतेम 25हजार मिळतात. याउलट आपल्या महाराष्ट्रापेक्षा आकाराने, लोकसंख्येने लहान असणारा श्रीलंका दानात महान ठरतो. आपल्यालाही दृष्टी पुरवतो!

आराध्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांनीच आता अवयवदान हे आपले कर्तव्य मानले पाहिजे. प्रत्येकाने मरणोपरांत अवयवदानाची आणि जिवंत असताना जे देणे शक्य आहे त्याची माहिती घेऊन ते केलेच पाहिजे. चिमुकल्या आराध्यासाठी पुकारलेला लढा तिला हृदय मिळवून दिल्यानंतरही सुरूच ठेवून आपण ते केलेच पाहिजे. नको त्यांच्या घशात कष्टाच्या पैशाचं दान घालून काहीच होणार नसते. मात्र, अवयवदानाने शंभर टक्के अमर होता येते, हा स्वार्थ तरी लक्षात ठेवूया. सज्जनांच्या रक्षणासाठी शस्त्रनिर्मिती करण्यासाठी स्वत:च्या अस्थींचे दान करण्याची दधिच परंपरा असणार्‍या आपल्याला हे इतर कुणी सांगायला पाहिजे का?
(लेखक दैनिक जनशक्तिच्या मुंबई आवृत्तीचे संपादक आहेत.)

आराध्याच्या निमित्ताने आपण सर्वांनीच आता अवयवदान हे आपले कर्तव्य मानले पाहिजे. प्रत्येकाने मरणोपरांत अवयवदानाची आणि जिवंत असताना जे देणे शक्य आहे त्याची माहिती घेऊन ते केलेच पाहिजे. चिमुकल्या आराध्यासाठी पुकारलेला लढा तिला हृदय मिळवून दिल्यानंतरही सुरूच ठेवून आपण ते केलेच पाहिजे. नको त्यांच्या घशात कष्टाच्या पैशाचं दान घालून काहीच होणार नसते. मात्र, अवयवदानाने शंभर टक्केअमर होता येते, हा स्वार्थ तरी लक्षात ठेवू या. सज्जनांच्या रक्षणासाठी शस्त्रनिर्मिती करण्यासाठी स्वत:च्या अस्थींचे दान करण्याची दधिच परंपरा असणार्‍या आपल्याला हे इतर कुणी सांगायला पाहिजे का?

आराध्याच्या लढ्याला साथ द्या!
आराध्याचा आज वाढदिवस. तिला आपण सार्‍यांनीच साथ दिली पाहिजे. तिला हृदय मिळू शकते ते दोन ते आठ वयोगटातील दात्याचे. ब्रेनडेड घोषित झालेले असे चिमुरडे देशभर अनेक असतात. कधी अपघातात तर कधी अन्य कारणांनी ते जीव गमावतात. आपण ही माहिती सर्वत्र पसरवा. कोणतेही असे दाता कुटुंब आढळल्यास त्वरित तिच्या बाबांना योगेश मुळ्ये यांना 09004145550 कळवा. मात्र, फक्त चौकशी करून, सहानुभूती दाखवण्यासाठी चुकूनही कॉल करू नका. तुमच्या कॉलच्या वेळेत एखाद्या दात्याचा कॉल मिस होऊ शकतो. एसएमएस करणे हे अधिक चांगले. माणूस म्हणून जबाबदारीने वागू या. कर्तव्य बजावू या.