मुंबई : गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनीत पिकनिक पॉइंटजवळील कोंबड पद येथे 45 वर्षाच्या महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे आरे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संशयितला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरु आहे. सोमवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पोलिसांना कोंबड पाड्यात रस्त्याचा बाजूला जंगलात एका महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन चौकशी सुरु केली असता ही महिला एमआयडीसी भागातील असून तिला रात्रीच्या वेळेस या भागात आणून टाकल्याचे प्रथम तपासणीत निदर्शनास आले आहे. श्रद्धाबाई हटकर असे या मृत महिलेचे नाव आहे. एक दिवस आधीच या महिलेच्या मुलाने या महिलेच्या बेपत्ता होण्याची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंदवली होती. या महिलेच्या डोक्याच्या मागच्या भागाला जखम झाली असून या महिलेवर अत्याचार झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. संशयित आरोपी हा एमआयडीसी परिसरातील एका ऑफीसचा वॉचमन असून त्याने हे कृत्य का केले हे अद्याप समोर आलेले नाही.