हडपसर : समुपदेशन म्हणजे मनाचा आरसा असतो. सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नांची जाणीव करून देऊन ते प्रश्न त्यांनाच सोडवायला लावणे म्हणजे समुपदेश असते. आपले मानसिक आरोग्य चांगले असेल तर कुटुंब व समाजाचे आरोग्य टिकते असे आरोग्यदायी जीवन ठेवण्यासाठी समुपदेशन ही काळाची गरज बनली आहे, असे मानसशास्त्रतज्ज्ञ डॉ. सुषमा भोसले यांनी सांगितले.
रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॉलेजमध्ये मानसशास्त्र विभागाच्या वतीने समुपदेशन केंद्राच्या उदघाटन करण्यात आले. यावेळी प्राचार्य. डॉ. अरविंद बुरुंगले, डॉ. शकुंतला सावंत, प्रा. वैशाली पाटील, डॉ. बेबी खिलारे, डॉ. सरोज पांढरबळे, प्रा. प्रवीण मोरे, प्रा. शिल्पा कुंभार, डॉ. सुनंदा पिसाळ, प्रा. स्वराली सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
डॉ. अरविंद बुरुंगले म्हणाले, महाविद्यालयीन स्तरावर समुपदेशन केंद्र असणे ही काळाची गरज ठरली आहे. कारण विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न व समस्या असतात. त्या सोडवण्यासाठी समुपदेश केंद्र कार्यरत असल्यास विद्यार्थ्यांना त्याच्या प्रश्नांची जाणीव करून देणे, त्यावर उपाय सुचविणे व योग्य दिशा देण्याचे काम करता येईल. प्रास्ताविक प्रा. शिल्पा कुंभार यांनी केले. सूत्रसंचलन डॉ. सरोज पांढरबळे यांनी केले व आभार प्रा. वैशाली पाटील यांनी मानले.