आरोग्याच्या तक्रारींचा ग्राहक पंचायत करणार पाठपुरावा

0

सणसवाडी । राजीव गांधी व महात्मा फुले जीवन आरोग्यदायी योजनांची अमलबजावणी होत नाही. सर्व सामान्य माणसांना या योजना बाबत पुरेशी माहिती नाही. त्यामुळे गरजू रुग्णास मदत मिळत नाही. याबाबत शिक्रापूर येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायत कार्यलयात अनेक तक्रारी आल्या आहेत. याबाबत कार्यालयात गुरुवारी (दि.21) झालेल्या बैठकीत ग्राहक पंचायतीमार्फत पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शासनाच्या सुचनेनुसार सरकारी व खासगी दवाखान्यात सर्व उपचाराचे दरपत्रक लावण्यात आले आहे की नाही याची गाव संघटकांना माहिती देण्यात आली आहे. रक्त तपासणी, सोनोग्राफी तसेच आरोग्याशी निगडीत असणार्‍या तपासण्यांचे दर पत्रक लावण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिलेले आहेत. याबाबत येणार्‍या तक्रारी, अहवाल यांची माहिती आरोग्य अधिकार्‍यांना देणे, याबाबत सर्व प्रशासकीय कर्मचारी व तालुका लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थित जनता दरबार घेण्यात येईल, असे तालुका अध्यक्ष सुनिल हिंगे यांनी यावेळी सांगितले. या बैठकीचे प्रास्ताविक देवेंद्र सासवडे यांनी केले. नागरिकांच्या समस्या प्रवीण गव्हाणे, संजय लवांडे यांनी मांडल्या. नामदेव दरेकर, पंकज बांगर, नामदेव चव्हाण, पंडित म्हसळकर तसेच अनेक गावांतील गाव संघटक याप्रसंगी उपस्थित होते.