आरोग्याच्या समस्यांकडे डोळेझाक

0

मुक्ताईनगर । शहरात काही दिवसांपूर्वी स्वाईन फ्ल्यू व डेंग्युचे रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली होती. मात्र यानंतर कोणत्याच प्रकारची उपाययोजना न करता ग्रामपंचायत प्रशासन बघ्याची भूमिका घेत नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. शहरात स्वच्छतेचा पुर्णत: बोजवारा उडाला असून नागरिकांचे आरोग्य संकटात सापडले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासिन भुमिकेमुळे मात्र सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

कराचा भरणा करुनही सुविधा मिळेना
मुक्ताईनगरमध्ये सहा वॉर्ड आहेत. प्रत्येक वॉर्डाचा ग्रामपंचायत सदस्य नागरिकांनी निवडून दिले आहे. परंतु त्यातील एक-दोन वॉर्ड सोडता कोणताच ग्रामपंचायत सदस्य नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी निवडून आल्यापासून वॉर्डात फिरकलेच नाही, असा नागरिकांचा आक्रोश आहे. फक्त वॉर्डात ग्रामपंचायत कर्मचारी पाणीपट्टी व घरपट्टीची करवसुली करतांना आढळतात. मात्र आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी वास्तविक दर महिन्यातून एकदा तरी सरपंच किंवा सदस्यांनी फेरफटका मारावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. जर ग्रामपंचायत प्रशाासन मुलभूत सोयी सुविधाच पुरवीत नसेल तर मग कर भरावा तरी कशासाठी असा संताप नागरिकांमध्ये व्यक्त केला जात आहे.

स्वच्छतेचा प्रश्‍न ऐरणीवर
येतील सहाही वॉर्डांची परिस्थिती स्वच्छतेच्या बाबतीत खालावली आहे. रस्त्यालगत बर्‍याच ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. रस्त्यांच्या दोन्ही कडेला मोठमोठे गवत व झाडेझुडपे वाढलेले आहे. काही ठिकाणी पाण्याचे डबके साचलेले आहे. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून नागरीक त्रस्त झाले आहे. नागरिकांना विविध प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासन याकडे कानाडोळा करतांना दिसते. शहरातील रस्त्यालगतचे गवत, झाडेझुडपे ग्रामपंचायतीने काढावे व जागोजागी असणारा कचरा उचलण्यात येवून संपूर्ण वॉर्डाची स्वच्छता करण्यात यावी. जेणेकरुन नागरिकांच्या आरोग्यास होणारा धोका टाळता येईल.

गटारींचा अभाव
शहरातील बर्‍याच भागांमध्ये गटारी नामशेष झाल्या आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. बर्‍याच ठिकाणी गटारी तुटलेल्या अवस्थेत आहेत तर गटारींचे उतार व्यवस्थीत न काढल्याने सांडपाणी गटारीतच राहून या गटारी वर्षानुवर्षे ग्रामपंचायती काढल्या जात नसल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत सदस्यांना समस्या सांगून सुध्दा याकडे दुर्लक्ष करुन वेळ काढूपणा सदस्य करत असल्याचे बोलले जाते.

पिण्याच्या पाण्याची समस्या
गेल्या निवडणूकीत नागरिकांना अ‍ॅक्वाचे पाणी थेट नळावाटे घरापर्यंत पोहचवू असे आश्‍वासन दिले होते. या आमिषाला बळी पडून नागरिकांनी मते दिली. मात्र राजकारण्यांनी नागरिकांच्या तोंडाला पानेच पुसली. अद्यापही अ‍ॅक्वाचा प्रकल्प उभा राहू शकला नाही व शुध्द पाणी नागरिकांपर्यंत पोहचू शकले नाही. पोहचले ते गढूळ पाणी. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. नळाचे पाणी सोडण्याचा वेळ निश्‍चित नसल्याने पाण्यासाठी नागरिकांना ताटकळत बसावे लागते.