आरोग्याधिकार्‍यांमुळेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात

0

धुळे । पावसाळा सुरु झाला असल्याने शहरात साथीचे आजार पसरले आहेत. ठिकठिकाणी डेग्यू, मलेरिया आदी रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतांना आरोग्य विभागाचे अधिकारी शहरात कोणत्याही प्रकारे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फवारणी करीत नसल्याचा आरोप सदस्या मायादेवी परदेशी यांनी केला आहे. स्थायी समितीची बैठक सभापती कैलास चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. दोन महिन्यापासून पावसाळा सुरु झाला आहे. प्रभागात आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. स्वच्छतेचे तीन तेरा वाजले असून शहरात सर्वत्र घाण असल्यमुळे डास, मच्छरांचा प्रार्दुभाव झाल्यानेे साथीच्या आजारात वाढ झाली आहे. आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळेनागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रुग्ण तपासणीअंती डेग्यू, मलेरियाचे रुग्ण आढळले तरी आरोग्य कर्मचारी अधिकार्‍यांना खोटी माहिती देवून दिशाभूल करतात. दिशाभूल करणार्‍या अधिकार्‍यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मायादेवी परदेशी यांनी केली आहे.

गढूळ पाणीपुरवठ्याने सदस्य संतप्त
शहरात बर्‍याचशा भागात गढूळ पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याचे नियोजन कोलमडले असून पाणीपुरवठ्याची चाचणी नियमित केली जात नसून दुषीत पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचा प्रश्‍न नगरसेवक साबीर मोतेवार यांनी उपस्थित केला. ब्लिचिंग पावडर, क्लोरीन पावडर याचे प्रमाण घेण्याचे अंदाज देखील चुकत आहेत. जनतेला स्वच्छ व शुद्ध पाण्याच्या पुरवठा करण्यासाठी प्रशासनाने विशेष बैठक घेऊन अधिकार्‍यांना त्याबाबत सुचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सभेत रामनगर जलकुंभ येथील 600 एम.एम. चा सुईस व्हॉल पुरवठा करणे व दुरुस्ती करणे, नकाणे रोड येथील कुणाल बिअरबारची अतिक्रमीत इमारत पाडलेल्या मटेरियलची वाहतूक करणे आदी विषयांना मंजुरी देण्यात आली आहे.