पुणे । महापालिकेतील आरोग्य अधिकारी राज्यसरकारचाच असावा, त्यासाठी सक्षम अधिकारी नेमणूक करण्याची मागणी राज्यसरकारकडे करणार असल्याचे आमदार विजय काळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. याशिवाय आरोग्य, शिक्षण या विषयावर तसेच शिष्यवृत्ती घोटाळ्यातील संस्थांविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी विधीमंडळात करणार असल्याचे काळे यांनी सांगितले.
महापालिकेच्या आरोग्यविभागाकडून रुग्णांना दवाखाने आणि रुग्णालयाकडून पॉलिक्लिनिकची सुविधा मिळत नाही. याविषयी अनेकदा आरोग्यविभागाशी चर्चा होऊनही त्यात सुधारणा होत नसल्याने या विभागाचे ऑडिट करण्याची मागणी अधिवेशनात प्रश्नाद्वारे केल्याचे काळे यांनी नमूद केले. अन्य खासगी दवाखन्यांचा खर्च परवडत नसल्याने रुग्ण महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये येतात, परंतु आरोग्य विभाग त्यांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडत नसल्याची तक्रार काळे यांनी केली. यामुळेच महापालिकेला पूर्णवेळ आरोग्य अधिकारी असावा अशी सातत्याने मागणी केली जात आहे. तो अधिकारी महापालिकेतील संबंधित विभागातील अधिकार्यांपैकी असण्यापेक्षा राज्य सरकारने त्यांच्याकडील सक्षम अधिकार्यांची नेमणूक करावी अशी मागणी राज्यसरकारकडे करणार असल्याचे काळे म्हणाले. राज्यातील विविध महाविद्यालयात आणि संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या शिष्यवृत्तींमध्ये घोटाळे उघडकीला आले असून, या शिक्षणसंस्थांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करणार असल्याचे काळे यांनी सांगितले.
महापालिकेची जागा देण्याबाबत चालढकल
चतु:श्रुंगी येथील नियोजित पाण्याच्या टाकीच्या जागेच्या बदल्यात महापालिकेची पोलिसांना जागा देण्याबाबत चालढकल सुरू असल्याचा आरोप आमदार विजय काळे यांनी केला आहे. जी जागा देण्याचे पत्र महापालिकेकडून दिले जाते ती आधीच कोणाला तरी दिलेली असते अथवा त्यावर आरक्षण पडलेले असते. त्यामुळे दुसरे आरक्षण न पाहताच जागेबाबतचे पत्र पोलीस खात्याला दिले जात असल्याचा आरोपही काळे यांनी केला.