नागरिकांनी जावे लागते खासगी दवाखान्यात
पुणे : जिल्ह्यातील नागरिकांना तत्काळ उपचार मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र उभारले आहे. मात्र, यातील काही केंद्रामध्ये आरोग्य अधिकारी नसल्यामुळे आरोग्य सेवा देताना त्रास होत आहे. उपलब्ध डॉक्टरांची दमछाक होत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 28 वैद्यकीय अधिकार्यांची पदे रिक्त असल्यामुळे नागरिकांनी खासगी दवाखान्यात जावे लागत आहे. पुणे जिल्ह्यात नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी जवळपास 96 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 539 उपकेंद्र आहेत. या केंद्रांवर उपचार घेण्यासाठी अनेक नागरीक जातात मात्र, अनेक दुर्गम भागांतील आरोग्य केंद्रात डॉक्टरच उपलब्ध नसल्याने नागरिकांना उपचार न घेता माघारी जावे लागते.
रुग्णांना आर्थिक भुर्दंड
आरोग्य अधिकाऱ्यांच्या रिक्त असलेल्या जागांचा प्रश्न नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चांगलाच गाजला. जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अनेक इमारतींची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, वैद्यकीय अधिकारीच नसल्याने या इमारती धुळखात पडून असल्याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्वांना निदर्शनास आणून दिले. अनेक दवाखान्यांत औषधे आहेत. मात्र, ती देण्यासाठी डॉक्टरच नसल्याने रुग्णांना आर्थिक भुर्दंड पडत असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
इंदापुरात आठ पदे रिक्त
जिल्ह्यातील रिक्त असलेल्या आरोग्य अधिकार्यांच्या भरतीसाठी मंत्रालयात पत्रव्यवहार करण्यात आला आहे. ही पदे भरण्यासंदर्भात लवकरच कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप माने यांनी दिली. सध्या जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील 28 दवाखान्यांत वैद्यकीय अधिकारी नसून, इंदापुर तालुक्यात 8 प्राथमिक आरोग्य केंद्रांवर वैद्यकीय अधिकारी नाहीत. तर जुन्नर तालुक्यात 4 आरोग्य केंद्रांवर वैद्यकीय अधिकारी नाहीत.
पदे भरण्याची प्रक्रिया सुरू
वैद्यकीय अधिकार्यांची पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही ठिकाणी कंत्राटी पद्धतीवर वैद्यकीय अधिकार्यांची पदे भरण्याचे काम सुरू आहे. लवकरच सर्व रिक्त पदे भरण्यात येतील. डॉ. दिलीप माने, आरोग्य अधिकारी