आरोग्य अधिकार्‍यांची सेवा समाप्त

0

जळगाव । महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकार्‍यांच्या कार्यक्षमते विषयी वारंवार तक्रार करूनही त्यांनी त्यांच्या कामात सुधारणा न करता शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत जंतुनाशक व दुर्गंधीनाशक यांचा लाखों रूपयांचा अतिरिक्त साठा खरेदी केलेला असतांना त्याचा वापर केला नसल्याची तक्रार स्थायी सभापती वर्षा खडके यांनी महासभेत करून आरोग्य अधिकार्‍यांना कार्यमुक्त करण्याचा ठराव मांडला. आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांना कार्यमुक्त करून नवीन अधिकार्‍याला नियुक्त करण्याची सूचना सभापती खडके यांनी मांडली. याप्रसंगी महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे, जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर, नगरसचिव अनिल वानखडे उपस्थित होते. ही महासभा महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील सभागृहात घेण्यात आली.

स्थायी सभापती वर्षा खडके व भाजपा नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी संयुक्तपणे आरोग्य विभागाच्या गोडावूनची पहाणी केली होती. या पाहणीत त्यांना केमीकलमध्ये तफावत आढळल्याने डॉ. विकास पाटील यांची चौकशी करावी अशी मागणी नितीन बरडे यांनी केली. स्थायी सभापती वर्षा खडके यांनी सांगितले की, आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांनी जानेवारी महिन्यात 200 लिटर जंतुनाशक 2 लाख 70 हजार खरेदी केली. तसेच फेब्रुवारी महिन्यात 600 लीटर जंतुनाशक तर 1200 लिटर दुर्गंधीनाशक असे एकूण 23 लाख 70 हजार रूपयांचा माल खरेदी केला. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात 2000 लीटर जंतुनाशक व दुर्गंधीनाशक खरेदी केलेले आढळून आले. जानेवारी ते जुलै महिन्यापर्यंत या 2000 लीटर जंतुनाशक व दुर्गंधीनाकामधून केवळ 300 लीटरच केमीकल वापरल्याचे सभागृहाच्या निदर्शनास वर्षा खडके यांनी आणून दिले. वांरवार सूचना देऊनही आरोग्य अधिकारी दखल घेत नसल्याची खंत खडके यांनी व्यक्त केली.

निविदेच्या प्रस्तावावर चर्चा
स्वच्छ महाराष्ट्र अंतर्गत 14 व्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधीतून 3 कोटी 22 लाख 87 हजार 490 रूपये खर्चांची निविदा प्रसिद्ध करण्याची प्रशासनाच्या आलेल्या प्रस्तावाबाबत चर्चा करण्यात आली. यात नगरसेवक नितीन बरडे यांनी आरोग्य अधिकारी यांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्‍न उपस्थित केला. आरोग्य विभागासाठी खरेदी केलेले गमबूट न वापरता पडून असल्याचे बरडे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच शहरात जिल्हाधिकार्‍यांनी प्रभारी आयुक्तपदाचा पदभार घेतल्यानंतर साफसफाईची पहाणी करून स्वच्छतेचा प्रश्‍न मार्गी लावला. परंतु, आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील हे कार्यालयाच्या बाहेर पडत नसल्याची तक्रार बरडे यांनी केली. शहरात डेग्यू, मलेरीयाची साथ पसरलेली असतांना केमीकलची आरोग्य अधिकार्‍यांनी फवारणीच केले नसल्याचे बरडे यांनी सांगितले. तसेच हे जंतुनाशक व दुर्गंधीनाशक हे कमी प्रतीचे असल्याचे बरडे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी त्यांनी केमीकलचा डब्बाच सोबत आणला होता.

डॉ. विकास पाटील यांना कोणतेही काम सांगितले तर ते उद्याच करतो असे सांगतात परंतु, त्यांचा उद्या कधीच उजडत नसल्याचे स्पष्ट करत त्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचा ठराव मांडला. कैलास सोनवणे यांनी 90 रूपये प्रती लिटर दराचे केमीकल 1300 रूपये लिटर खरेदी केल्याने आरोग्य अधिकार्‍यांना कार्यमुक्त करा अशी मागणी केली. भाजपाचे रविंद्र पाटील यांनी आरोग्य अधिकार्‍यांच्या अकार्यक्षमतेचा मुद्दा उचलून धरत डॉ.विकास पाटील अखत्यारीत असलेल्या जन्म-मृत्यू विभागातील वाईट अनुभव कथन केलेत. सभागृह नेते रमेश जैन यांनी जंतुनाशक व दुर्गंधीनाशक केमीकलची लॅब मधून तपासणी करण्याची सूचना मांडली. तसेच आरोग्य अधिकारी म्हणून प्रभाग अधिकारी उदय पाटील यांची नियुक्ती करण्याची शिफारस केली. पृथ्वीराज सोनवणे यांनी केमीकल खरेदी करतांना कोण कोण होते याची चौकशी करण्याची मागणी केली.