आरोग्य अधिकार्‍यांच्या बदलीवरुन भाजप- सेनेत खडाजंगी

0

जळगाव- मनपा आरोग्य अधिकारी उदय पाटील यांच्या बदलीच्या सत्ताधार्‍यांकडून आलेल्या प्रस्तावावर सत्ताधारी भाजपा व विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक होवून खडाजंगी झाली. शहराच्या सफाईसाठी 75 कोटी रुपयांच्या एकमुस्त ठेक्यात भ्रष्टाचार करण्यासाठी सत्ताधारी भाजपाकडून मनपा आरोग्य अधिकारी उदय पाटील यांचा बदलीचा घाट घालण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना गटनेते अनंत जोशी यांनी महासभेत केल्याने महासभेत गोंधळ उडाला. या गोंधळातच भाजपाने बहुमताने आरोग्य अधिकारी उदय पाटील यांची बदलीचा ठराव मंजूर करून घेतला.

महापौर सीमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष महासभा घेण्यात आली. या सभेत मनपा प्रशासनाकडून व आयत्या वेळचे विषय मिळून एकूण 28 विषयांना महासभेने मंजुरी दिली. महासभेत भाजपाकडून मनपा आरोग्य अधिकारी उदय पाटील यांच्या जागेवर डॉ.विकास पाटील यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव महासभेत मांडला. यावेळी नगरसेवक सचिन पाटील यांनी मनपाचा आरोग्य विभाग अभियंत्यांकडे दिला असल्याने खेदाची बाब असल्याचे सांगत त्यांची बदली करण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिली. तसेच त्यांनी डा. विकास पाटील यांच्याबाबत केलेला मागील ठराव रद्द करण्यात यावा असे सांगीतले.

डॉ. विकास पाटील यांच्या चौकशीचे काय?
हा ठराव भाजपाने बहुमताने मंजूर करून घेतल्यानंतर विरोधकांनी या ठरावाला विरोध केला. शिवसेनेचे नगरसेवक नितीन लढ्ढा म्हणाले की, अधिकारी किंवा मनपा कर्मचार्‍याचा बदलीचा निर्णय हा केवळ आयुक्तांचा असून, हा विषय महासभेपुढे आणणे चुकीचे असल्याचे सांगितले. मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी सांगितले की, डॉ.विकास पाटील यांच्यावर फिनाईल खरेदीच्या व्यवहारात गंभीर आरोप होते. त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्याचा ठराव करण्यात आला होता. तसेच त्यांची या प्रकरणात चौकशी सुरु असताना त्यांची बदली आरोग्य अधिकारी म्हणून करता येणार नसल्याचे सुनील महाजन यांनी सांगितले. तसेच त्यांच्या चौकशीचे काय झाले याचा खुलासा देखिल नितिन लढ्ढा यांनी विचारला.

निविदा अंतिम टप्प्यात असताना बदलीचा प्रस्ताव का?
अनंत जोशी यांनी आरोग्य अधिकार्‍याचा बदलीच्या मागे सत्ताधार्‍यांचा केवळ एकमुस्त सफाईच्या ठेक्यात अपात्र ठेकेदाराला पात्र करण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप केला. सफाईचा ठेक्याची निविदा अंतीम टप्प्यात असताना आरोग्य अधिकार्‍यांचा बदलीचा प्रस्ताव का आणला ? असा प्रश्न जोशी यांनी उपस्थित केला. या मुद्यावरून भाजपा व शिवसेना नगरसेवकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. शेवटी हा ठराव मंजूर करण्यात आला.