महाड । ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या आरोग्य उपकेंद्रांच्या इमारती अक्षरश: धूळ खात पडल्या आहेत. रुग्ण दूरच, परंतु या इमारतींकडे कर्मचारीही फिरकत नसल्याने उपकेंद्रांच्या इमारती शोभेच्या वास्तु झाल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागत आहे.
महाड तालुक्यात सहा प्राथमिक केंद्र आहेत. या प्राथमिक केंद्रांतर्गत महाड तालुक्यात 27 आरोग्य उपकेंद्र आहेत. याकरिता भल्या मोठ्या इमारतींचा ढाचा तयार करण्यात आला. त्यानुसार या इमारती बांधण्यात आल्या आहेत. यापैकी 8 आरोग्य उपकेंद्र ही राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत तर जवळपास 15 केंद्रांच्या इमारती या रायगड जिल्हा परिषदेने बांधल्या आहेत. एका आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीला सुमारे 25 ते 30 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या इमारती संपूर्ण रायगड जिल्ह्यात या इमारती बांधल्या आहेत. मात्र, पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने आणि या ठिकाणी नेमलेल्या आरोग्य सेवकाची राहण्याची मानसिकता नसल्याने हे आरोग्य उपकेंद्र धूळ खात पडले आहे.
निजामपूर येथील इमारत पूर्णपणे नादुरुस्त
महाडमध्ये बिरवाडी, विन्हेरे, पाचाड, चिंभावे, दासगाव, वरंध या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. बिरवाडीमधील मांघरूण, वाळण बु, शेलटोली, चिंभावे विभागातील चोचिंदे, दासगाव भागातील टोळ बु, वरंधमध्ये कुंभे शिवथर, वरंध, या ठिकाणी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत तर वाळण खु, निगडे, ताम्हाणे, आंबवडे, नागाव, करंजाडी, मुमुर्शी, कोंझर, नाते, आचलोळी, अप्पर तुडील, देशमुख कांबळे, इसाने कांबळे, राजेवाडी, भावे या ठिकाणी रायगड जिल्हा परिषदेने करोडो रुपये खर्च करून इमारती बांधल्या आहेत. यापैकी छत्री निजामपूर याठिकाणी रायगड जिल्हा परिषदेने जवळपास दहा वर्षांपूर्वी आरोग्य उपकेंद्र बांधले होते. मात्र, तेव्हापासून हे आरोग्य उपकेंद्र कधीच सुरू राहिलेले नाही. यामुळे निजामपूर येथील इमारत पूर्णत नादुरुस्त झाली आहे.
आरोग्य सेवेचे तीनतेरा
महाड तालुक्यात वैद्यकीय अधिकारी 12 पदे मंजूर आहेत. यापैकी 8 पदे भरलेली आहेत. 4 वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त आहेत. आरोग्य पर्यवेक्षक दोन्ही पदे रिक्त, आरोग्य सहाय्यक 13 पैकी 4 रिक्त पदे, आरोग्य सहायिका 1 रिक्त पद, औषध निर्माता 4 रिक्त पदे, आरोग्यसेविका मुख्यालय 3 रिक्त पदे, आरोग्य उपकेंद्रावर नेमण्यात आलेल्या आरोग्य सेविका 5 रिक्त पदे, आरोग्य सेवक 5 रिक्त पदे, वाहनचालक 5 रिक्त पदे, शिपाई 4 रिक्त पदे, सफाई कामगार 6 रिक्त पदे आहेत. महाड तालुक्याला तालुका आरोग्य अधिकारीदेखील उपलब्ध नाही. तालुक्यातील आरोग्य अधिकारीच तालुका आरोग्य अधिकारी पद सांभाळत आहे. या आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे तालुक्यातील आरोग्य सेवेचे तीनतेरा वाजत आहेत.
कर्मचार्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांचे झाले हाल
टोळ गावात बांधण्यात आलेले आरोग्य उपकेंद्र अद्याप सुरूच झालेले नाही. मांधरुण, वाळण येथे केवळ इमारतींचे दर्शन होते. एकीकडे भव्य इमारती बांधण्यात आल्या. मात्र, या ठिकाणी सोयी-सुविधा नसल्याने कर्मचारीदेखील थांबत नाहीत.त्यातच या आरोग्य उपकेंद्रावर पुरेसा कर्मचारी वर्गच उपलब्ध नाही. प्रत्येक आरोग्य उपकेंद्रावर एक आरोग्यसेवक आणि एक आरोग्यसेविकेची नेमणूक आहे. मात्र, महाड तालुक्यात आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात कर्मचार्यांचा तुटवडा आहे.
याबाबत येत्या सभेत आपण आवाज उठवणार असून, तत्काळ कर्मचारी भरती आणि आरोग्य उपकेंद्र सुरू केले जावेत, अशी मागणी केली जाईल.
– मनोज काळीजकर,
जिल्हा परिषद सदस्य