भोर । तालुक्यातील पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांसाठी 10 कोटी 55 लाख तर रस्त्यांच्या कामांसाठी 2 कोटी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ही सर्व 13 कोटी 55 लाख रुपये खर्चाची कामे दर्जेदार व्हावीत यासाठी स्वत: लक्ष घालणार असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी भोर येथील जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रणजीत शिवतरे, भोर तालुका राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष चंद्रकांत बाठे, सरचिटणीस प्रकाश तनपुरे, भोर पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे उपअभियंता बी. वाय. शेळके, शाखा अभियंता आय. एल. शेख, ए. के. पाटील, ए. जी. खुटवड आदी उपस्थित होते.
जागेअभावी रखडले आरोग्य उपकेंद्र
कासुर्डी खेडे बारे, कारी आणि कुसगांव येथे आरोग्य उपकेंद्र उभारण्यास मंजुरी मिळालेली आहे. परंतु जागा उपलब्ध होत नसल्याने कार्यवाही करण्यास अडथळा येत आहे. या गावच्या नागरिकांनी जागा उपलब्ध करून दिल्यास या उपकेंद्रांचीही उभारणी करता येईल, असे माने यांनी सांगितले. आंबाडे खोर्यातील नेरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे 2 कोटी 22 लाख रुपये खर्चाचे काम पूर्ण झाले असून या आरोग्य केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि खासदार सुप्रीया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच करण्यात येणार असल्याचे माने यांनी यावेळी सांगितले.
जायखिंड रस्त्यासाठी 73 लाख
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत भोर तालुक्यातील नेरे-पाले-वरवडी या रस्त्याच्या कामासाठी 50 लाख, करंदी जायखिंड रस्त्यासाठी 73 लाख, कुसगांव ते खोपी-कांजळे रस्त्याच्या कामासाठी 60 लाख आणि भोरच्या पूर्वेकडील न्हावी-पेंजळवाडी रस्त्यासाठी 52 लाख असा एकूण 2 कोटी 60 लाख रुपये खर्चाचा निधी मंजूर झाला असून, या रस्त्यांच्या कामांच्या निविदाही काढण्यात आल्या असून, लवकरच या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती प्रवीण माने यांनी दिली.
जिल्ह्यात समतोल विकासाची कामे
संपूर्ण पुणे जिल्ह्यात कोणताही दुजाभाव न करता समतोल विकासाची कामे केली जाणार असून, सर्व कामे दर्जेदार व्हावीत यासाठी प्रयत्न राहतील. या झालेल्या कामांची पाच वर्षांपर्यंत देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची राहणार असून, या पोटी 10 टक्के देखभाल दुरुस्तीचा खर्च ठेकेदाराकडून आगाऊ जमा करण्यात आलेला असल्याचे सांगून डी. पी. डी. सी. ची कामे जिल्हा नियोजनकडे जिल्हा परिषदेमार्फतच पाठवली जाणार असल्याचा खोचक मुद्दाही माने यांनी आवर्जून उपस्थित केला.
हिर्डोशी आणि भुतोंडेसाठी 2 कोटी
दुर्गम डोंगरी भागातील हिर्डोशी आणि भुतोंडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या उभारणीसाठी अनुक्रमे 2 कोटी 42 लाख आणि 3 कोटी 74 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पिसावरे आणि रायरी येथील उपकेंद्रांसाठी प्रत्येकी 1 कोटी 44 लाख, तर पसुरे उपकेंद्रासाठी 1 कोटी 51 लाख रुपयांचा निधी मंजूर असल्याचे सांगून ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या सर्व सुविधा देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.
प्रवीण माने, पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि बांधकाम सभापती