आरोग्य चित्रपट महोत्सवासारखे उपक्रम महत्त्वाचे

0

पुणे । आरोग्य या विषयावर आपल्या देशात फार कमी बोलले जाते. हल्लीच्या काळात आपल्यापैकी अनेक जण नैराश्य व भीती अशा समस्यांचा सामना करत असतात. अशा वेळी आरोग्याविषयी बोलणारे चित्रपट पाहून आपल्यासारखे इतरही लोक जगात आहेत आणि त्यातून मार्ग निघू शकतो, हे आपल्या लक्षात येते. त्यामुळेच आरोग्य चित्रपट महोत्सवासारखे उपक्रम फार महत्त्वाचे आहेत, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री पर्ण पेठे यांनी व्यक्त केले. पी. एम. शहा फाऊंडेशनतर्फे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) येथे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या आरोग्य चित्रपट महोत्सवाचा समारोप अभिनेते आलोक राजवाडे आणि पर्ण पेठे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी पर्ण पेठे बोलत होत्या. संस्थेचे व महोत्सवाचे संचालक अ‍ॅड. चेतन गांधी यावेळी उपस्थित होते.

लघुपट व माहितीपट चित्रपटांमध्ये स्पर्धा
या महोत्सवात आरोग्य हा विषय केंद्रस्थानी ठेवून बनवलेले 30 चित्रपट दाखवण्यात आले. महोत्सवात लघुपट व माहितीपट अशा दोन विभागांमध्ये चित्रपटांची स्पर्धाही घेण्यात आली होती. त्यात ’द रिटर्न गिफ्ट’ या लघुपटाने आणि ’अ फ्यू डेज मोअर’ या माहितीपटाने प्रथम पारितोषिक पटकावले. ’93 नॉट आऊट’ आणि ’एक पाऊल’ या लघुपटांना आणि ’दॅटस् माय बॉय’ व ’अ मॅन वर्थ हिज सॉल्ट’ या माहितीपटांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय पारितोषिके प्रदान करून गौरवण्यात आले. चित्रपट हे प्रभावी माध्यम असून ते केवळ मनोरंजनच करत नाही, तर जगण्याविषयीचा दृष्टीकोनही देते, असे पर्ण यांनी सांगितले.

दिग्दर्शकांसाठी चांगले व्यासपीठ
आजच्या काळात आपण तुकड्या-तुकड्यांमध्ये जगतो. आपल्या अवतीभवतीच्या विषयांमध्ये कप्पे फार लवकर तयार होतात. अशा वातावरणात आरोग्य आणि कला या दोन गोष्टींचा काय संबंध, असा प्रश्‍न विचारला जाऊ शकतो. कोणती कला क्रांती घडवते, असे विचारले जाते. कलेमुळे माणूस संपूर्णत: बदलला नाही तरी डोळे नक्की उघडतात. संकुचित डबक्यापासून दूर जाऊन असे वैश्‍विक भान येणे महत्त्वाचे आहे, असे आलोक यांनी सांगितले. आरोग्य या विषयाला वाहिलेला हा देशातील पहिला चित्रपट महोत्सव असून काहीतरी वेगळे करू इच्छिणार्‍या दिग्दर्शकांसाठी हा महोत्सव एक चांगले व्यासपीठ ठरेल, तसेच या माध्यमातून आरोग्यासंबंधीच्या विविध विषयांवर प्रबोधनही होईल, असे मत चेतन गांधी यांनी व्यक्त केले.