आरोग्य निरीक्षक देणार सामुहिक राजीनामे

0

जळगाव । महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे तपासणीत शहरातील कचरा उचलणार्‍या मक्तेदारांनी व्यवस्थित काम न केल्यास त्यांना दंड करण्यात येत आहे. अस्वच्छतेच्या तक्रारी आल्याने आयुक्तांनी आज वार्ड क्र. 3 शिवाजी नगर येथे पाहणी करण्यासाठी उपायुक्त लक्ष्मीकांत कहार व आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांना पाठविले होते. यावेळी या पाहणीत तेथे अस्वच्छता व दुरावस्था दिसून आली असल्याचा ठपका ठेवत मुख्य स्वच्छता निरीक्षक अशोक एन. नेमाडे, युनिट प्रमुख दिनेश गोयर व मुकादम यशवंत काळे यांच्यावर आयुक्त सोनवणे यांनी कारवाई केली. दरम्यान, ही कारवाई अन्यायकारक असून याविरोधात सर्व 14 आरोग्य निरीक्षकांनी सामुहीक राजीनामा देणार असल्याचे महानगरपालिका वर्तुळात संध्याकाळी चर्चा सुरु होती. कर्मचार्‍यांवर अन्याय होत असल्याची भावना यावेळी दिसून आली.

आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर
मक्तेदाराला दुपारी 2 वाजेपर्यंत साफसफाई करण्याची वेळ देण्यात येते. तसेच यानंतर त्याने सफाई केली नसेल तर अशा मक्तेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येत असते. यानुसार दुपारी 2 वाजेनंतर संबंधीत मक्तेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याचे समजते. मक्तेदाराकडून दंड घेऊनही निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने कर्मचार्‍यांनी नाराजी व्यक्त केली. प्रामाणिकपणे काम करूनही निलंबन होत असेल्यानेच सामुहिक राजीनाम्याचे हत्यार उपसण्यात येत असल्याचे स्पष्ट संकेत कर्मचार्‍यांनी दिले आहेत. आरोग्य सेवा ही अत्यावश्यक सेवेत मोडत असते. सर्वच आरोग्य निरीक्षकांनी राजीनामा दिल्यास शहाराच्या स्वच्छतेचे बोजवरा उडविण्याची शक्यता दिसत आहे. यामुळे आयुक्तांनी योग्य तो हस्तक्षेप करत आरोग्य निरीक्षकांचे प्रश्‍न सोडवावेत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मक्तेदारास टाकले काळ्या यादीत
मुख्य स्वच्छता निरीक्षक अशोक नेमाडे व युनिट प्रमुख दिनेश गोयार व मक्तेदाराने कर्तव्यात कसून केल्याचे दिसून येत असल्याने श्री. नेमाडे व श्री. गोयर यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच मक्तेदारास काळ्या यादीत टाकण्याची सूचना करण्यात आली आहे. मात्र, हा आदेश एकतर्फी असून तो कर्मचार्‍यांवर अन्यायकारक असल्याचे मत आरोग्य निरीक्षकांनी मांडले आहे. काम व्यवस्थित करूनही कर्मचार्‍यांवर निलंबनासारखी कारवाई करण्यात येत असल्याने कर्मचार्‍यांमध्ये रोष महापालिका परिसरात पहावयास मिळत होता.

मक्तेदाराची बिले थांबविली
यापूर्वीही संबंधीत मक्तेदारांवर दोन वेळा दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे असेही आदेशात म्हटलेले आहे. मक्तेदाराकडून काम करून घेण्याची जबाबदारीही मोकादम श्री. काळे, युनीटप्रमुख श्री. गोयर व मुख्य स्वच्छता निरीक्षक नेमाडे या तिघांची असून त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे प्रथम दर्शनी दिसत असल्याचे आदेशात म्हटले आहे. कर्तव्यात कसूर केल्याने तिघांना शुक्रवार 19 मे पासून निलंबित करण्याचा आदेश आयुक्त सोनवणे यांनी दिला आहे. यासोबतच मक्तेदारास काळ्या यादित टाकून त्याची सर्व बिले तात्काळ थांबविण्याची सूचना आयुक्त सोनवणे यांनी केली आहे.

एकतर्फी आदेश; कर्मचार्‍यांचा आरोप
बाजू न ऐकताच निलंबनाचे एकतर्फी आदेश देण्यात आल्याची भावना महापालिका वर्तुळात दिसून आली. मुकादमास दोन वेळा दंड केला असतांना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे असल्याचे आदेशात दिसत आहेत. शहरातील स्वच्छतेचा प्रश्‍न ऐरणीवर आलेला असतांना आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांनी निलंबित केल्याने शहरातील स्वच्छतेचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. मुख्य स्वच्छता निरीक्षक, युनिट प्रमुख, मुकादम यांच्यावर निलंबनाची कारवई करण्यात आल्याने सर्व 14 आरोग्य निरीक्षक शनिवारी सामुहिक राजीनामा सादर करणार आहेत. कामाचा बोजा बघता जास्त काम करीत असतांना निलंबन करुन अन्याय झाल्याची चर्चा आहे.

उपायुक्त, आरोग्याधिकार्‍यांनी केली पाहणी
मक्तेदारास टाकले काळ्या यादीत