पुणे । महापालिकेच्या येरवडा येथील भारतरत्न राजीव गांधी रुग्णालय तसेच सोनावणे प्रसृतीगृह येथे नवजात अर्भक अतिदक्षता विभाग सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रीया वादात सापडण्याची चिन्हे आहेत. सुमारे 1 कोटी 75 लाख रूपयांच्या या साहित्य खरेदीसाठी आरोग्य विभागाने युएस एफडी – अप्रुव्हल असणे सक्तीचे केले आहे. यामुळे एकाही भारतीय कंपनीला टेंडर भरणे शक्य होणार नाही. त्यामुळे ही उपकरणे भारतीय कंपन्या स्वस्तात तयार करत असतानाही त्यांना या निविदा प्रक्रीयेत सहभागी होता येणार नसल्याचा आरोप सजग नागरिक मंचाने मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर, निमंत्रक विश्वास सहस्त्रबुध्दे यावेळी उपस्थित होते.
महापालिकेकडून पालिकेच्या काही रूग्णालयांमध्ये अशा प्रकारची यंत्रणा अस्तित्वात आहे जेथे संपूर्ण भारतीय बनावटीची यंत्रणा उत्तम काम देत आहे. इतकेच नव्हे तर भारतीय कंपन्यांनी बनवलेली वैद्यकीय उपकरणे अनेक देशांमध्ये निर्यात ही होत असून ती अमेरिकन कंपन्यांपेक्षा 30-40 टक्क्यांनी स्वस्तही आहेत. असे असतानाही पुणे मनपाच्या आरोग्य विभागाने युएस एफडी – अप्रुव्हलची अनाकलनीय व अनावश्यक अट टाकून स्पर्धा तर कमी केलीच आहे शिवाय ही यंत्रणा महागडीही मिळणार आहे, आणि सर्वात महत्वाचे केंद्र व राज्य सरकारच्या मेक इन इंडीया या महत्वाकांक्षी योजनेला हरताळ फासण्याचा घाट महापालिकेकडून सुरू असल्याचा आरोप मंचाने केला आहे.
22 डिसेंबरची अंतिम मुदत
या निविदा भरण्यासाठी 22 डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. त्यानंतर तातडीने या निविदा खुल्या केल्याची शक्यता या प्रकारामुळे नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने ही निविदा भरण्याची मुदत संपण्या आधी निविदेमधील ही युएस एफडी-अप्रुव्हल ही अट काढून टाकण्यात यावी अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे. ही अट काढल्यास देशातील कंपन्यांनाही त्यात सहभागी होता येईल. तसेच या निविदेमध्ये स्पर्धा होऊन महापालिकेचा आर्थिक फायदा होईल. तसेच अशा प्रकारची अट ही जाणूनबुजून घालण्यात आली असून एका ठराविक कंपनीसाठीच हा घाट घातला जात आहे. त्यामुळे संबधित अधिकार्याचीही तातडीने चौकशी करावी, अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.