पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या विधी समितीने आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदाचा विषय उपसूचनेसह शुक्रवारी मंजूर केला. या पदावर डॉ. पवन साळवे यांची नियुक्ती करावी, अशी शिफारस महासभेला केली आहे. आता या नावावर महासभेत शिक्कामोर्तब होवून पदभार सोपविण्यात येईल. दरम्यान, या पदावर कोण? याचा निर्णय घेण्यासाठी विधी समिती सभेची दोनवेळा तारीख ठरविण्यात आली होती. मात्र, गणपूर्ती अभावी सभा तहकूब करण्यात आली होती.
साळवे यांनी दिले होते आव्हान
तत्कालीन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नागकुमार कुणचगी यांच्या निवृत्तीनंतर गेली चार वर्ष हे पद रिक्त आहे. या जागेवर रॉय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तथापि, या नियुक्तीला अतिरिक्त वैद्यकीय संचालक साळवे यांनी आव्हान दिले. आपली सेवा ज्येष्ठता, शैक्षणिक अर्हता असताना डावलेल्या गेल्याची भूमिका साळवे यांनी मांडली आहे. याबाबत अनुसुचित जाती-आयोग, राज्य सरकारचे दरवाजे साळवे यांनी ठोकले होते.
विधी समितीला अधिकार
राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदाबाबत यथोचित निर्णय घेण्याच्या आदेश दिले. या पार्श्वभूमीवर झालेल्या विभागीय पदोन्नती सभेत आयुक्त हर्डीकर यांनी सावध पवित्रा घेतला. आरोग्य वैद्यकीय अधिकारी पद आणि वैद्यकीय संचालक पद समकक्ष असून त्याबाबतचा निर्णय विधी समितीने आणि महासभेने घ्यावा, अशी शिफारस केली होती.
महासभेनंतर पदभार सुपुर्द
गणसंख्येअभावी विधी समितीची सभा दोनदा तहकूब करण्यात आली होती. त्यानंतर आज (शुक्रवारी) झालेल्या विधी समिती सभेत आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदाचा विषय उपसूचनेह मंजूर करण्यात आला आहे. आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. पवन वसंत साळवे यांची नियुक्ती करावी, अशी शिफारस विधी समितीने महासभेकडे केली आहे. डॉ. साळवे यांच्या नावावर महासभेत शिक्कामोर्तब होईल. त्यानंतर त्यांच्याकडे पदभार सोपविण्यात येईल.
तत्कालीन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नागकुमार कुणचगी यांच्या निवृत्तीनंतर आरोग्य अधिकारीपदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक अर्हता डॉ. साळवे यांच्याकडे होती. परंतु, चुकीच्या पद्धतीने डॉ. के. अनिल रॉय यांची आरोग्य अधिकारीपदी नियुक्ती केली. साळवे यांच्यावर अन्याय झाला आहे. आरोग्य अधिकारीपदी डॉ. पवन साळवे यांची नियुक्ती करावी, अशी शिफारस महासभेकडे केली आहे.
-शारदा सोनवणे, सभापती, विधी समिती