पिंपरी-चिंचवड : महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. के. अनिल रॉय की डॉ. पवन वसंत साळवे यांची नियुक्ती करावी, याबाबतचा निर्णय लांबणीवर पडला आहे. आरोग्य अधिकारीपदाचा निर्णय न्यायप्रविष्ठ आहे. न्यायालयाने जानेवारीपर्यंत वैद्यकीय अधिकारीपदाबाबत ‘जैसे थे’ निर्णय ठेवा, असा निर्णय दिला आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. के. अनिल रॉय कायम असणार आहेत.महापालिकेची नोव्हेंबर महिन्याची तहकूब सभा मंगळवारी पार पडली. अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. सभेच्या विषय पत्रिकेवर पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी रॉय यांना पदावनत करुन डॉ. पवन साळवे यांची नियुक्ती करण्याचा विषय होता. आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदाचा निर्णय न्यायप्रविष्ठ असल्याने हा विषय तहकूब ठेवण्यात आला.
चार वर्षांपासून पद रिक्त
तत्कालीन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नागकुमार कुणचगी यांच्या निवृत्तीनंतर गेली चार वर्ष हे पद रिक्त आहे. या जागेवर डॉ. रॉय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने डॉ. रॉय यांची नियुक्ती केली होती. मात्र, ती चुकीची असल्याचा साक्षात्कार सत्ताधारी भाजपला झाला आहे. त्यामुळे त्यांना पदावनत करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.
‘जैसे थे’ न्यायालयाचा निर्णय
पालिकेच्या विधी समितीने डॉ. रॉय यांना दिलेली पदोन्नती चुकीची असल्याचा ठराव केला. पालिकेचे अतिरिक्त आरोग्य व वैद्यकीय अधिकारी पवन साळवे यांना डावलून डॉ. रॉय यांना चुकीच्या पद्धतीने पदोन्नती करण्यात आल्याचे विधी समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे साळवे यांना आरोग्यप्रमुख करावे, अशी शिफारसही विधी समितीने केली आहे. ती अंतिम मंजुरीसाठी मंगळवारी महासभेपुढे ठेवण्यात आली होती. दरम्यान, विधी समितीच्या या निर्णयाला डॉ. रॉय यांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयाने जानेवारीपर्यंत आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदाबाबत ’जैसे थे’ निर्णय ठेवा, असा निर्णय दिला आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकारीबाबतचा विषय तहकूब ठेवण्यात आला.