आरोग्य समिती अध्यक्षांच्या प्रभागात कचर्‍याचा ढिगारा

0

मुंबई । स्वच्छ मुंबई… सुंदर मुंबई…, असा नारा देणारी मुंबई महानगरपालिका पावसाळ्यात नागरिकांच्या आरोग्याच्या हिताच्या गोष्टी करते. पावसात भिजू नका, रस्त्यावरील पदार्थ खाऊ नका, पाणी उकळून प्या, रस्त्यावर कचरा टाकू नका. मात्र, मुंबई मनपाच्या आरोग्य समिती अध्यक्षा डॉ. अर्चना भालेराव यांच्या प्रभाग 126 मध्ये रस्त्यावर कचर्‍याचा मोठ्या प्रमाणात ढीग पडून आहे. या प्रभागात झोपड्याची संख्या मोठ्या प्रमाणावर असून कचरा टाकण्यासाठी पालिकेकडे नियोजित जागा नाही. जगदुशा नगर येथील मुलांसाठी खेळण्यासाठी असलेल्या खेळासाठी मैदानात कचरा टाकला जातो आहे.

या उद्दानातील शोभेची झाडेदेखील ऐन पावसाळ्यात कोलमडली आहेत. उद्दानात काही ठिकाणी चालणार्‍या बांधकामाचे डेब्रिजदेखील येथे टाकण्यात येते. माधवबाग मैदानाच्या आडोशाला सार्वजनिक शौचालय असून या शौचालायच्या रस्त्याच्या अडूनच मोठ्या प्रमाणावर कचरा पसरलेला आहे. प्रभागात साठलेला कचरा वेळेत उचलला जात नसल्याने पावसात कचरा ओला होऊन त्याची दुर्गंधी प्रभागात पसरत असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून प्रभागाच्या नगरसेविका तसेच आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी असणार्‍या डॉ. अर्चना भालेराव स्वतःच्या प्रभागात स्वच्छता राखून प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतील का? असा प्रश्‍न विचारला जात आहे.