आरोपपत्र दाखल करण्यास विलंब; आरोपीला जामीन

0

पिंपरी-चिंचवड : सॉफ्टवेअर अभियंता तरुणी अंतरा दास (वय 23) हिच्या बहुचर्चित निर्घृण खूनप्रकरणी धक्कादायक घडामोड सामोरे आली आहे. आरोपी संतोषकुमार अखिलेश्‍वरप्रसाद गुप्ता (वय 24) याला वडगाव मावळ न्यायालयाने बुधवारीच जामीन मंजूर केला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे या हत्याकांडाचा तपास आहे. तपास अधिकार्‍यांनी 90 दिवसांच्या मुदतीत आरोपपत्रच दाखल न केल्याने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एच. वाय. कावळे यांना नियमाप्रमाणे आरोपीस जामीन मंजूर करावा लागला. त्याबद्दल न्यायालयाने तपास अधिकार्‍यांना चांगलेच फैलावर घेतले. तसेच, कारणे दाखवा नोटीसही बजावली. मुदतीत आरोपपत्र दाखल न करून तपास अधिकार्‍यांनी कामात कसूर केल्याचा ठपकाही न्यायालयाने ठेवला आहे.

जामीन मंजूर; परंतु पोलिसांत हजेरी द्यावी लागणार
तळवडे येथील कॅपजेमिनी या सॉफ्टवेअर कंपनीत अभियंता असलेली अंतरा दास या तरुणीचा 23 डिसेंबरच्या रात्री संतोषकुमार गुप्ता या आरोपीने भोसकून निर्घृण खून केला होता. त्यावरून जनमाणस चांगलेच संतप्त झाले होते; तसेच तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. या हत्याकांडाचा तपास करून नियमाप्रमाणे 90 दिवसांच्याआत आरोपपत्र न्यायालयात दाखल करणे गरजेचे होते. परंतु, आरोपीची नार्को चाचणी करता आली नाही, असे कारण सांगून पोलिसांनी आरोपपत्र दाखल करण्यास विलंब लावला. त्यामुळे वडगाव मावळचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एच. वाय. कावळे यांना आरोपीस जामीन मंजूर करावा लागला. त्यामुळे संतप्त झालेल्या न्यायाधीशांनी तपास अधिकार्‍यांनी 15 दिवसांच्याआत प्रतिज्ञापत्र सादर करावे. वेळेत आरोपपत्र का दाखल केले नाही, याबाबत कारणे दाखवा नोटीसही न्यायालयाने तपास अधिकार्‍यांना बजावली. समाधानकारक उत्तर दिले नाही तर कायदेशीर कारवाईचा इशाराही न्यायालयाने दिला आहे. सोबतच, आरोपीची नार्को चाचणी करण्याची परवानगीही न्यायालयाने दिली. आरोपी गुप्तास जामीन मंजूर केला असला तरी, आरोपीने देहू रोड पोलिस ठाण्यात दररविवारी सकाळी 11 वाजता हजेरी देण्याचे आदेशही न्यायालयाने दिलेत. तसेच, न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाण्यास निर्बंधही न्यायालयाने घातले आहेत.

पोलिसांचा अक्षम्य हलगर्जीपणा चव्हाट्यावर!
आरोपी गुप्ता याचे वकील अनुप पांडे यांनी मात्र आरोपीचा पुरेपूर बचाव केला. आरोपीविरुद्ध पोलिसांकडे काहीही पुरावे नाहीत. तसेच, तो नार्को चाचणीस सामोरे जाण्यासही तयार आहे. त्यामुळे आरोपीची तुरुंगातून सुटका करण्यात यावी, अशी मागणी अ‍ॅड. पांडे यांनी केली. तर पोलिसांनी आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी 45 दिवस मिळावेत, अशी विनंती न्यायालयास केली होती. परंतु, न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावली. आरोपी गुप्ता हा मुळचा बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील असून, त्याने 23 डिसेंबररोजी रात्री साडेआठच्या सुमारास तळवडे येथे पायी जात असलेल्या अंतरा दास हिचा तीक्ष्ण हत्याराने वारंवार भोसकून निर्घृण खून केला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अंतराचा हिचा मृतदेह रस्त्याने जात असलेल्या सत्येंद्र सिन्हा यांनी पाहिला आणि त्यांनी ही घटना पोलिसांना कळवली होती. अंतराला खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी देहू रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. अटक झाल्यापासून आरोपी हा येरवडा तुरुंगात होता. या प्रकरणाच्या तपासात ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांचा अक्षम्य हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला असून, त्याबद्दल खुद्द न्यायालयदेखील चांगलेच संतप्त झालेले आहे.