नागपूर । पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघ शिकार प्रकरणातील शिकार्यांना वनविभागाच्या अधिकार्यांनी पकडले .मात्र शिकार्यांच्या मागे नव्हे तर त्यांना पकडणार्या वनाधिकार्यांच्या पाठीशी राज्य सरकारने उभे राहिले पाहिजे. या प्रकरणात आरोपींना वाचविण्यासाठी अधिकार्यावर राजकीय दबाव येत असल्याने मुख्यमंत्र्यांनी यामध्ये वैयक्तिक लक्ष घालावे, असे आवाहन नागपुरातील वन्यजीव प्रेमींनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.
वन्यजीव प्रेमी आणि स्वयंसेवी संस्थांची बैठक
मुख्यमंत्री व महाराष्ट्र वन्यजीव सल्लागार मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना याबाबत निवेदन देण्यात येणार आहे. धंतोली येथील टिळक विद्यालयात वन्यजीव प्रेमी आणि स्वयंसेवी संस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. शिकार प्रकरणात अटक करण्यात आलेले काही आरोपी हे येथील राखीव पेंचच्या जलाशयात मासेमारी करत. तसेच मासेमारीसोबतच ते वाघाची शिकार करीत असल्याचे अटक केल्यानंतर उघड झालेले आहे. अटक केल्यामुळे मासेमारी करणार्यांची संख्या कमी झाली. त्यामुळे मासेमारांना प्रोत्साहन देणार्या मासेमार माफीयाही या आरोपींना सोडविण्यासाठी सक्रीय झाल्याने राजकीय पक्ष पुढे आल्याची चर्चाही या बैठकीत करण्यात आली.त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून तपास करणार्या अधिकार्यांना बळ द्यावी अशी मागणी निवेदनातून केली जाणार असल्याचे बैठकीत एकमताने ठरविण्यात आले.सृष्टी पर्यावरण संस्थेचे संजय देशपांडे, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते, विनित अरोरा यांच्यासह अन्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.