साक्री । येथील गढी भिलाटी भागात रहाणार्या रंगनाथ रामभाऊ भवरे या इसमास मारहाण करुन त्याच्याजवळील रोकड लुटणार्या आरोपींविरुध्द पोलिसात तक्रार करुनही कार्यवाही झाली नाही. उलट भवरे यांच्या भिल्ल समाजातील नातलगांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे भवरे यांना मारहाण करणार्या आरोपींना अटक करुन कारवाई भील समाजाचा साक्रीत तहसीलवर मोर्चा करावी, या मागणीसाठी भिल्ल समाजातील महिला-पुरुषांनी आज तहसिल कचेरीवर धडक मोर्चा काढला. यावेळी तहसिलदारांना निवेदनही देण्यात आले. भिल्ल समाजातील रंगनाथ रामभाऊ भवरे यांना दि.17 जुलै रोजी दुपारी 2 वाजता सार्वजनीक ठिकाणी मारहाण करुन त्यांच्या जवळील 30 हजार रुपयांची रोकड लुटून नेण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसात राहुल विश्राम पगारे, अतुल विश्राम पगारे, बापु आप्पा पगारे, जितु बापु पगारे, रोहित बापु पगारे, संतोषआप्पा पगारे, विश्राम पगारेचा जावई सोमनाथ पगारे यांच्याविरोधात रितसर तक्रार करण्यात आली होती.
समाजात तीव्र संताप
साक्री पोलिसात गुन्हा दाखल होवूनही या आरोपींवर कुठलीही कारवाई केली नाही उलट तक्रार देणार्या रंगनाथ भवरे यांच्या नातलगांवर खोटे गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे भिल्ल समाजात तीव्र संताप व्यक्त होत असून पक्षपात करणार्या पोलिसांविरुध्द तक्रार करण्यासाठी आज तहसिल कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. तहसिलदारांनी भवरे यांना मारहाण करणार्या आरोपींना अटक करण्याचे आदेश द्यावेत तसेच दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मोर्चात भिल्ल समाजातील महिला-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तर तहसिलदारांना निवेदन देतांना रंगनाथ भवरेसह गोविंदा दशरथ सोनवणे, गणेश रामु सोनवणे, मनिष रामदास सोनवणे,दशरथ रंगनाथ भवरे, अरुण रंगनाथ भवरे आदींचे शिष्टमंडळ गेले होते.