आरोपीच्या मारहाणीची व्हिडिओ क्लिप वकिलाने केली व्हायरल!

0

येरवडा (सोमनाथ साळुंके) । फरार आरोपीस येरवडा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यास पोलिसांचा खाकी हिसका दाखवत असताना आरोपीच्या वकिलाने त्याची व्हिडिओ क्लिप काढल्याने पोलिसांनी गंभीर गुन्ह्यातील आरोपीवर कारवाई करायची की नाही? असा प्रश्‍न आता पोलिसांसमोरच उभा राहिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी येरवडा भागात काही गटात मारामारीच्या घटना घडल्याने घटनेतील आरोपी हैदर रफीक शेख यांच्यावर हत्याराने मारहाण केल्याप्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधा 326चा गुन्हा दाखल होता. आरोपी घटना घडल्यानंतर फरार झाला होता. येरवडा पोलीस त्याचा शोध घेत असताना रविवारी (दि.5) तो येरवडा पोलिसांच्या हाती लागला. त्याला ताब्यात घेऊन पोलिस त्याची चौकशी करत होते. तेव्हा तो आपण गुन्हा केल्याचे कबूलच करत नसल्याने येरवडा पोलिसांनी अखेर त्याला आपला खाकी हिसका दाखवला. त्याचवेळी आरोपीचे वकील मनीष ननावरे यांनी ही घटना मोबाइलमध्ये शूट केली. तुम्ही त्याच्यावर जबरदस्ती करून गुन्हा कबूल करून घेत असल्याने याबाबत आपण आमदारांची भेट घेऊन ही क्लिप दाखविणार असल्याचे सांगितले अखेर तसेच केले व घटनेची क्लिप ही आमदारांना दाखवली.

गुन्हेगारांची हिंमत वाढते
एखाद्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी गुन्हा कबूल करत नसेल तर पोलिसांना त्यांचा खाकी हिसका दाखविणे गरजेचे असते. तसे न झाल्यास गुन्हेगारांची हिंमत वाढते आणि शहरात कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्‍न निर्माण होतो. शासकीय कामात अडथळा आणणे हे चुकीचे आहे. याआधी येरवडा भागाची ओळख गुन्हेगारांचा परिसर म्हणून होती. मात्र परिसरात खासगी कंपन्यांचे जाळे पसरल्याने युवकांना रोजगार उपलब्ध झाल्याने परिस्थिती बदली आहे. वर्षभरात घडलेल्या गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यात येरवडा पोलिसांना यश आले आहे. त्यातच कायदा सांगणारे जर ‘अशिलाचा बचाव’ या नावाखाली खतपाणी घालत असेल, तर गुन्हेगारांना देखील मोकळे रान सापडेल, अशी उद्वेगजनक प्रतिक्रिया एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. याविषयी सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी अ‍ॅड. ननावरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

पोलिस कर्मचार्‍यांना बदनाम करण्यासाठी…
येरवडा पोलिसांनी या आरोपीस ताब्यात घेतले तेव्हा त्याच्याकडे दुचाकी व एक हत्यारही मिळाले होते. ही दुचाकी त्याच्या मित्राची होती. यादरम्यान दुचाकी युवकास पोलीस स्टेशनला कागदपत्रे घेऊन बोलाविले. काही वेळाने गाडीच्या कागदपत्रांसह तीन युवक दाखल झाले. त्यातील एकाने पोलिसांना न विचारताच आरोपीला बाहेर नेले. गाडीचे कागदपत्र घेऊन आलेल्या युवकाने पोलिसांशी शाब्दिक बाचाबाची करण्याचा प्रयत्न केला. इतर दोन युवक तेथे शांत बसले होते. यामध्ये एक वकील होता. त्याने कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करून या घटनेची मोबाइलमध्ये शूट करून ती आमदारांना दाखविण्याची धमकी दिली.

आणि आमदारांना ती क्लिप दाखवली
त्यांनी मध्यस्थी करून हे प्रकरण थांबविण्यास सांगितले. त्यावेळेस प्रकरण मिटले आहे असे वाटत असतानाच वकील महाशयांनी हे वृत्त प्रसिद्धही केले. पोलिस कर्मचार्‍यांना बदनाम करण्यासाठी हा सर्व डाव रचल्याची चर्चा पोलिस वर्तुळात आहे.