पुणे – हिंदू जनजागृती समितीने पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणातील आरोपी अमोल काळे (४० ) याचा २००८ नंतर संघटनेशी संबंध राहिला नसल्याचा दावा केला. अटकेतील आरोपी काळे याने वैयक्तीक कारणामुळे त्यावेळी संघटना सोडल्याचेही हिंदू जनजागृती समितीने म्हटले आहे. कर्नाटक पोलिसांच्या विशेष पथकाने गौरी लंकेश हत्याप्रकरणात अमोल काळे याच्यासह मनोहर एडवे (३०), सुजीत कुमार उर्फ प्रवीण (३७), अमित दिगवेकर उर्फ प्रदीप यांना अटक केली आहे.
अमोल काळे हा हिंदू जनजागृती समितीशी २००८ पर्यंत संलग्न होता, हे हिंदू जनजागृती संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी मान्य केले आहे. गेली १० वर्षे काळे याने संघटनेच्या कामात सहभाग घेण्याचे थांबविले होते व तो संघटनेच्या संपर्कात नव्हता, असा त्यांनी दावा केला आहे. पुणे झोन ३ चे पोलीस उपआयुक्त गणेश शिंदे यांनी सांगितले की, आरोपी काळेला खून, कट रचणे व अवैध शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी २१ मे रोजी बंगळुरू पोलिसांनी प्रथम अटक केली होती.