सराईत गुन्हेगाराला सोडविण्यासाठी नातलगांचा पोलिसांवर हल्ला
सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा
वडगाव मावळ : गेल्या काही दिवसांमध्ये आरोपींनी पोलिसांना मारहाण करण्याच्या घटनांमध्ये वाढ होते आहे. वडगाव मावळ तालुक्यातील एका आरोपीच्या दरोडा व खंडणीच्या दाखल गुन्ह्याची आरोपीकडे चौकशी करत होते. त्या आरोपीच्या नातेवाईकांनी पोलीस अधिकारी व महिला कर्मचार्याला मारहाण केली. त्याचवेळी आरोपीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांशी झटापट करीत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा शनिवारी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. भीमराव शंकर मोरे, गोरख मारुती मोरे व प्रशांती भीमराव मोरे (सर्व रा. वडगाव, ता. मावळ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक दगडू हाके यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मंगेश भीमराव मोरे यांच्यावर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात दरोडा व खंडणीचा गुन्हा दाखल केला.
हे देखील वाचा
महिला कर्मचारी जखमी
वडगाव मावळ पोलिसांनी सांगितले की, आरोपी मंगेश मोरे याच्याकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम व महिला पोलीस कर्मचारी रुपाली कोहिनकर पोलीस ठाण्यामध्ये चौकशी करत होते. त्याला गुन्हा करताना पोलिसांनी रंगेहात पकडले होते. या गुन्ह्याबाबत अधिक माहिती घेत होते. त्यावेळी आरोपी मंगेश मोरे यांचे वडील भीमराव मोरे, चुलता गोरख मोरे व आई प्रशांती मोरे आदींनी चिडून सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम यांचा लॅपटॉप फेकून दिला. त्यांची कॉलर पकडून शिवीगाळ करून मारहाण केली. आरोपीची आई प्रशांती मोरे हिने महिला पोलीस कर्मचारी रुपाली कोहिनकर यांना धक्काबुक्की, शिवीगाळ करून मारहाण केली. यामध्ये गळ्याला व डोक्याला नखे लागून जखमी झाल्या. आरोपी मंगेश मोरे याला पोलीस ठाण्यामधून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पोलीस ठाण्यामधील हा प्रकार पाहून अन्य पोलीस कर्मचार्यांनी धाव घेतली. त्याचवेळी पळून जाणार्या आरोपीला पकडले. आरोपीचे नातेवाईक घटनास्थळावरून फरार झाले.
पोलिसांना केली मारहाण
सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम यांनी आरोपींवर सरकारी कामात अडथळा तसेच शिवीगाळ मारहाण केल्याची फिर्याद दिली. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक दगडू हाके म्हणाले की, आरोपी मंगेश मोरे सराईत गुन्हेगार असून, अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहे. त्याला सोडवण्यासाठी त्याच्या नातेवाईकांनी अविश्वसनीय घटना केली आहे. त्यातील आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल.