मुंबई- मालेगावमधील २००८ सालच्या बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपनिश्चिती संदर्भातील सुनावणीला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिल्यानंतर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयए कोर्टातील आरोपनिश्चितीच्या प्रक्रियेला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. 12 नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.
मालेगावमधील बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळू शकला नाही. या प्रकरणात विशेष न्यायालयात मंगळवारी होणाऱ्या आरोपनिश्चितीसंदर्भातील सुनावणीला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएच्या विशेष न्यायालयाने आरोप निश्चित केले आहेत. बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित, मेजर उपाध्याय यांच्यासह ७ आरोपींवर दहशतवादी कट व हत्येचा ठपका ठेवण्यात आला आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जलदगतीने आणि कुठल्याही विलंबाविना घेण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाला नुकतेच दिले होते. ३० ऑक्टोबर रोजी या प्रकरणातील मुख्य आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह अन्य आरोपींवर दहशतवादी कारवाया केल्याप्रकरणी आरोप निश्चित करण्यात आले. एनआयच्या विशेष न्यायालयात या सर्वांविरोधात आरोप निश्चिती करण्यात आली. मात्र, या सुनावणीला स्थगिती देण्यासंदर्भात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती.