आरोप-प्रत्यारोपांचा पाऊस

0

राजकीय पक्षांचे एकमेकांकडे बोट

मुंबई । दलग दुसर्‍या दिवशीदेखील मुसळधार पावसाने मुंबापुरीला झोडपल्यामुळे या महानगरातील जीवनावर परिणाम झाला. सर्वच भागात पाऊस झाला नसला तरी अनेक ठिकाणी जोरदार सरी कोसळल्यामुळे नागरिकांना अडचणी आल्या. दरम्यान, पावसात सर्व मुंबईकरांनी ऐक्याची भावना दाखवली असतांना राजकीय पक्षांनी मात्र याचे भांडवल करण्याची संधी सोडली नाही. विरोधकांनी आपत्ती व्यवस्थापनात मुंबई महापालिकेतील सत्ताधारी असणारे शिवसेना व भाजप सपशेल चुकल्याचे आरोप केलेत. तर दुसरीकडे खुद्द उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन महापालिकेच्या कथित कुशल कारभाराचे गोडवे गायले. महापालिकेच्या कार्यकुशलतेमुळेच मुंबई पूर्वपदावर आल्याचा दावादेखील त्यांनी केला.

दरम्यान, मंगळवारच्या पावसाने मुंबईत अनेकांचा बळी घेतल्याची माहिती बुधवारी समोर आली आहे. आज शहरातील काही भागात जोरदार सरी कोसळल्या. मात्र सर्वच भागात पाऊस न झाल्यामुळे जनजीवन काही प्रमाणात तरी पूर्वपदावर आल्याचे दिसून आले. तथापि, वाहतूक पूर्णपणे सुरळीत न झाल्यामुळे चाकरमान्यांना अनेक अडचणी आल्या.

ढग फुटला असता तर…
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यात उध्दव ठाकरे म्हणाले की, “काल मुंबईच्या डोक्यावर 9 किमी उंचीचा मोठा ढग होता. सुदैवानं तो फुटला नाही. नाहीतर परिस्थिती आणखी बिकट झाली असती.” दुसरीकडे नालेसफाईवरुन शिवसेनेवर सध्या टीका करण्यात येत आहे. मात्र, हे आरोप उद्धव ठाकरेंनी फेटाळून लावले आहेत. नालेसफाई झाली नाही हा आरोप खोटा असल्याचं यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं. मुंबईत पाणी तुंबल्यानंतर महापालिका कर्मचार्‍यांसोबत महापौर, आमदार आणि शिवसैनिक मदतीसाठी पुढे सरसावले असंही उद्धव ठाकरेंनी आवर्जून सांगितलं.

दहाच्या वर बळी
मंगळवारच्या मुसळधार पावसात दहा पेक्षा जास्त जणांचा बळी गेला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृत आणि जखमींचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. बॉम्बे हॉस्पिटलचे पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर हे पाण्यातून वाट काढत घरी जात असतांना मॅनहोलमधून वाहून गेल्याची भिती व्यक्त होत आहे. तर कारमध्ये गुदमरून प्रीतम नामक वकीलाचा मृत्यू झाला आहे. घाटकोपर येथील रामेश्वर तिवारी (45) यांच्या घरावर स्लॅब कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. विक्रोळी पंचशील चाळ येथे राहणार्‍या निखील पाल या दोनवर्षीय मुलाचा दरड कोसळण्याच्या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला. पार्कसाईट येथे राहणारी कल्याणी गोपळ शंकर जंगम ही दोनवर्षांची मुलगीही दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत मरण पावली. दहीसर आणि कांदिवली येथे नाल्यात वाहून गेल्याने प्रतीक सुनील (20) आणि ओमप्रकाश निर्मल (26) यांचा मृत्यू झाला. मढ जेट्टीवर रोहित कुमार चिन्नू (17) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. नाल्यात बुडून एका 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. तर ठाण्यातही चार जणांचा मृत्यू झाला.

विरोधकांचे टीकास्त्र
तर दुसरीकडे विरोधकांनी या आपत्तीत महापालीक प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप करत शिवसेना-भाजपवर टीकास्त्र सोडले. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या संपूर्ण परिस्थितीला महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि पहारेकरी भाजपा यांनाच जबाबदार धरले आहे. धनंजय मुंडे म्हणाले, “उद्धव ठाकरे म्हणत होते पाणी तुंबणार नाही मग काल काय झाले ? कुठे गेली हजारो कोटी रुपये खर्च करून केलेली कामे ? मुंबईकरांच्या मदतीला मुंबईकर येतो, सत्ताधारी आणि पहारेकरी नाही हेच काल दिसले अन्य मुंबईकरांचा महापालिकेवर का भरोसा नाय हेही स्पष्ट झाले.” याशिवाय काँग्रेस नेते संजर निरूपम आणि मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांनीही या प्रकरणी शिवसेनवर जोरदार टीका केली. तर शिवसेनेने राज्य व केंद्र सरकारलाही जबाबदार धरले, तर भाजपने मुंबईचे महापौरांना जाब विचारला आहे.