आरोप सिद्ध करा नाहीतर तुरुंगात पाठवेन; ममता बॅनर्जींचा अमित शहांना दम

0

कोलकाता: शेवटच्या टप्प्यातील मतदान शिल्लक असतांना पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसचा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. संपूर्ण देशाचे याकडे लक्ष लागले आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराला तृणमूल कॉंग्रेस जबाबदार असल्याचे आरोप भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केले होते. दरम्यान आज तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपने तृणमूलवर केलेले आरोप सिद्ध करावे, अन्यथा तुरुंगात पाठवेन, असा इशारा दिला आहे. तृणमूलवर खोटे आरोप करताना लाज वाटत नाही का, असा सवालदेखील त्यांनी केला आहे.

निवडणूक आयोग भाजपचा भाऊ
‘भाजपाने निवडणूक आयोगाकडे आमची तक्रार केल्याचे समजले. पंतप्रधान मोदींच्या सभेनंतर आमची सभा होऊ नये, यासाठी भाजपाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. निवडणूक आयोग भाजपाचा भाऊ आहे. आधी आयोग निष्पक्ष होता. मात्र आता निवडणूक आयोग विकला गेला आहे, असेप्रत्येकजण म्हणतो,’ अशा शब्दांत त्यांनी निवडणूक आयोग आणि भाजपावर टीकेची झोड उठवली.

भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांनाही ममता यांनी लक्ष्य केले. ‘आम्ही विद्यासागर यांचा पुतळा उभारु असे मोदी म्हणतात. बंगालकडे पुतळा उभारण्यासाठी पैसा आहे. तुम्ही पुतळा उभाराल. पण 200 वर्षांचा वारसा पुन्हा आणू शकाल का?’, असा सवाल ममता यांनी उपस्थित केला. पुतळा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तोडला, याचे पुरावे आमच्याकडे आहेत असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.