शविआचे गटनेते राजीव देशमुख यांना नगरसेवक घृष्णेश्वर पाटील यांचे आव्हान
चाळीसगाव -गेल्या 4 नोव्हेंबर रोजी मी नगरपालिका चाळीसगाव येथे नगरपालिकेच्या प्रशासनाचा अनागोंदी कारभार व मागील काळातील झालेला भ्रष्टाचार याबाबत माझी भूमिका मांडली होती. त्यानंतर दि.6 नोव्हेंबर रोजी शहर विकास आघाडीचे गटनेते राजीव देशमुख यांनी केलेले आरोप सिध्द करून दाखवावे असे आव्हान नगरसेवक घृष्णेश्वर पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिले.
गेल्या पंधरवाड्यापासून घृष्णेश्वर पाटील व शहर विकास आघाडी मध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असून आज सायंकाळी उद्योजक हिराशेठ बजाज यांच्या कार्यालयात पाटील यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी घृष्णेश्वर पाटील यांच्यासह जेष्ठ नगरसेवक राजू चौधरी, शिवसेनेचे शहर प्रमुख व नगरसेवक नानाभाऊ कुमावत, नगरसेविका विजयाताई पवार,वीजया भिकन पवार, चंद्रकांत तायडे, अरुण आहिरे, शेखर बजाज, चिराग शेख, मानसिंग राजपुत, भास्कर पाटील, माजी नगरसेवक सोमासिंग राजपुत, हिराशेठ बजाज उपस्थित होते. पाण्याच्या टाकी पाडण्यासाठी केलेल्या कामाच्या मोबदल्यात बील काढून देण्यासाठी मी 3 लाख रुपये घेतले असल्याचा आरोप यांचे सहकारी नगरसेविका पती फकीरा मिर्झा मार्फत यांनी केला. याबाबत वस्तुस्थिती अशी आहे की 2 वर्षापूर्वी फकीरा मिर्झा यांच्या पत्नी तथा शहर विकास आघाडीच्या नगरसेविका यास्मिना बेग फकीरा मिर्झा या 3 अपत्य असल्याने नगरसेविका या पदासाठी अपात्र ठरल्या होत्या. या अपात्रतेसाठी ज्यांनी अर्ज केला होता त्या प्रमिलाताई चौधरी यांना मी मदत केली असल्याचा राग फकीरा मिर्झा यांना होता. 45 वर्ष आम्ही गाव सांभाळले असा दावा करणार्या आघाडीच्या गटनेत्यांना फकीरा मिर्झा याने 20 महिन्यानंतर सांगावे याचा अर्थ काय समजावा? मुळात मी केलेल्या आरोपांवरील लक्ष इतरत्र वळविण्यासाठी हा आरोपाचा खेळ खेळला गेला आहे.
राजीव देशमुख यांना आव्हान
आघाडीचे गटनेते राजीव देशमुख यांना आव्हान देतो की, त्यांनी माझ्यावर केलेला आरोप सिद्ध करून दाखवावा. आरोप सिद्ध केल्यास मी राजकारणातून संन्यास घेईल अथवा सिद्ध न केल्यास नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी संन्यास घ्यावा अथवा आपल्या पदाचा त्याग करावा. माझे वर केलेल्या आरोपाबाबत कायदेतज्ञांचा सल्ला घेऊन अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी राजू अण्णा चौधरी, सोमसिंग राजपुत, हिराशेठ बजाज यांनी विविध विषयांवर मत मांडले.