धुळे । तालुक्यातील आर्णी येथील शेतकरी व माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश दयाराम पाटील यांना रक्ताचा कर्करोग झाल्याने त्यांच्यावर मुंबई येथील टाटा स्मारक केंद्रात उपचार सुरु आहेत. या उपचारासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च लागणार असल्याने त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 1 लाख रुपयाची मदत मिळवून देण्यात आली.यासाठी धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी सहकार्य केले. या आजाराच्या उपचारासाठी त्यांना 10 लाखांपेक्षा जास्त खर्च येणार आहे. आर्थिक परिस्थिती साधारण असल्याने त्यांना हा खर्च पेलवणे शक्य नव्हते. सुरेश पाटील यांच्या नातेवाईकांनी माजी आमदार प्रा.शरद पाटील यांच्या संपर्क साधून मदत मिळवून देण्याची विनंती केली. त्यानुसार प्रा.पाटील यांनी मा.मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाला अर्ज करुन कागदपत्रे दाखल केली होती. त्यानुसार सुरेश पाटील यांच्या उपचारासाठी 1 लाख रुपये मंजूर करण्यात आले. नातेवाईकांनी प्रा.शरद पाटील यांचे आभार मानले.