आर्थिकदृष्ट्या सक्षम शहादा शहर राजकीय इच्छाशक्तीअभावी अस्वच्छतेच्या गर्तेत

0

नंदुरबार । जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या सगळ्यात जास्त सक्षम असलेले शहर म्हणुन शहादा शहराची ख्याती असतांना नगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे शहरात अनेक समस्यांना शहरवासियांना व परिसरातील तसेच ग्रामीण भागातुन शहरात येणार्‍या नागरिकाना सामोरे जावे लागत आहे. एकीकडे भारताचे पंतप्रधान संपुर्ण स्वच्छ भारत अभियान राबवुन देशाला स्वच्छ् करण्याचा प्रयत्न करीत असतांना शहरात मात्र स्वछतेचा लवलेशही आढळत नाही. नंदुरबार जिल्हयाच्या खासदार डॉ. हिना गावीत ह्या सत्ताधारी भाजपा पक्षाचा असुनही त्याचप्रमाणे व्यावसायीकदृष्ट्याही त्यांचा संबंध या क्षेत्राशी असतांना तसेच शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार उदेसिंग पाडवी हे सुध्दा भाजपचे असुनही शहादा शहरातील घाणीकडे ह्या एकाही नेत्यांकडून लक्ष दिले जात नसल्याचे दुर्देव आहे.

जागोजागी गटारी तुंबल्या
शहरात जागोजागी उकीरडे तयार झाले आहेत. गटारी तुंबलेल्या आहे रस्त्यावर धुळ साचलेली असते. पाण्याचे डबके सर्वत्र दिसत आहे. मात्र यावर उपाय शोधण्याची कोणाचीच मानसिकता दिसत नाही. जागोजागी तयार झालेल्या उकीरड्यामुळे रोग राई पसरत आहे. ठिकठिकाणी साचलेल्या डबक्यामुळे शहरात डेंग्यु आणि मलेरियाचा प्रादुर्भाव वाढत आहे. ह्या समस्यांकडे कोणीच गांभीर्याने पहात नसल्यामुळे नागरिकामध्ये असंतोष वाढत आहे.

जैसे थे परिस्थिती
भाजपच्या खासदार डॉ. हिना गावीत यांनी नगरपालीका निवडणुकीचा वेळी शहादेकरांना खुप भावुकतेने आवाहन केले होते की तुम्ही भाजपाला निवडुन द्या आम्ही शहाद्याला आदर्श शहर म्हणुन बनवुन दाखवु. सहा सात महिने उलटुन ही शहादे शहराची अवस्था जैसे थे अशीच आहे. याची जबाबदारी कोण घेणार ? कारण की नंदुरबार जिल्ह्याचा खासदार त्याचप्रमाणे भाजपा जिल्हाध्यक्ष यांचा शब्दांना मान देवुन शहादेकर नागरिकांनी शहादा नगरपालिकेची सत्ता पहिल्यांदा भाजपाचे मोतीलाल पाटील यांचा हातात दिली.

घनकचर्‍यांचे व्यवस्थान करा
लोकप्रतिनीधीनी तसेच नगरपालिकेचा अधिकार्‍यांनी शहर वासियांचा या समस्यांची सोडवणूक लवकरात लवकर करावे हीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहराला खर्‍या अर्थाने जर स्वछ करायचे असेल तर रस्त्यावर जगोजागी होणारा कचरा एका दिवसाआड उचलणे आवश्यक आहे. त्याशिवाय शहर स्वछ होवुच शकत नाही. दर आठ दिवसात तुंबलेल्या गटारी साफ करणे, घनकचर्‍यांचे व्यवस्थापन योग्य रितीने होणे आवश्यक आहे. सुका कचरा व ओला कचरा याची विभागणी होणे आवश्यक आहे.