चोपडा । कारखानदारी हे प्रदुषणाचे एक कारण आहे. वाढती कारखानदारीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत आहे. कारखान्याद्वारे होणारे प्रदुषण मोजमापासाठी विशेष यंत्रणा असते. प्रत्येक कारखान्याला यंत्रणा बसविणे बंधनकारक आहे. मात्र जळगाव जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांनी प्रदुषण मापक यंत्रणा बसविली नसल्याने त्यांना प्रदुषण नियंत्रण मंडळाने नोटीस बजावली आहे. फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना व चोपडा येथील चोपडा सहकारी साखर करखान्याचा यात समावेश आहे. कारखान्यातून निघणारे दुषीत पाणी, निघणार्या धुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करावे असे आदेश या कारखान्यांना देण्यात आले आहे. मात्र कारखान्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने यंत्रणा बसविण्यास विलंब होत आहे. पुढील आदेश आदेश होईपर्यत कोणत्याही प्रकारचे उत्पादन घेऊ नये अशी सुचना देण्यात आली आहे. मसाका व चोसाकाने कारखान्याचा परवाना नुतनीकरणासाठी अर्ज केले होते.
यंत्रणा बसविण्यास कारखान्यांचा विरोध
कारखान्यातून निघणारे सांडपाणी, धूर याचे प्रमाण ऑनलाईन मॉनिटरिंग सिस्टिमद्वारे कळते. सिस्टिम बसविल्यास थेट दिल्लीहून त्यावर नियंत्रण असते. त्यासाठी कॅमेरे, संगणक तसेच आवश्यक तंत्रज्ञान बसविणे गरजेचे आहे. राज्यभरातील साखर कारखान्यांना नोटीसा बजविण्यात आल्या आहेत. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील चोसाका व मसाका साखर कारखान्याची आर्थिक स्थिती बिकट असल्याने कर्मचार्यांचे वेतन देखील वेळेवर होत नसल्याने यंत्रणा बसविण्यासंबंधी नोटीस मिळाल्याने आर्थिक अडचणी अभावी कारखान्यांनी विरोध केला आहे.
मागील वर्षी देखील आदेश दिले
प्रदुषण नियंत्रण मंडळाने मागील वर्षीच राज्यातील सर्व साखर कारखान्यांना कारखान्यात प्रदुषण मोजण्यासाठीची यंत्रणा (ऑनलाईन मॉनिटरिंग सिस्टिम) कार्यान्वित करुन ती दिल्ली प्रदुषण नियंत्रण मंडळाशी कनेक्ट करण्याचे आदेश दिले होते. कारखान्याच्या धुराडीतून निघणार्या धूर व मळीतून निघणारे सांडपाण्याचे योग्य पध्दतीने व्यवस्थापन केले जात नसल्याच्या तक्रारी प्रदूषण नियंत्रण मंडळाला प्राप्त झालेल्या होत्या. संबंधीत कारखान्यांना ऑनलाईन मॉनिटरिंग सिस्टिम बसविल्या शिवाय परवाना नूतनीकरण होणार नाही असे आदेश डिसेंबर 2016 मध्ये देण्यात आले होते. केंद्रीय नोटीशीनंतर संबंधीत सिस्टिम बसविण्याबाबत कारखान्यांनी कार्यावाही केली नाही व जळगाव येथे प्रदुषण नियंत्रण मंडळ कार्यालयाशी संपर्क साधून माहितीही घेतली नाही.
अधिकार्यांची भेट घेणार
जळगाव शहरातील प्रदुषण नियंत्रण कार्यालयाकडून आदेश प्राप्त झाले असल्याने संबंधीत कार्यालयाची भेट दोन्ही कारखान्यांचे अधिकारी पदाधिकारी भेट घेणार आहे. कारखान्याची व्यथा ते प्रदुषण नियंत्रण संस्थेसमोर मांडणार आहे. प्रदुषण कमी करण्यासाठी कारखाना स्तरावर प्रयत्न केले जात असल्याचे कारखाना व्यवस्थापकांनी सांगितले आहे. जळगाव प्रदूषण केंद्रामार्फत दिल्ली येथील अधिकार्यांशी चर्चा करण्यात येणार आहे.