आर्थिक परिस्थिती खालावली असल्याची अनिल अंबानी यांची कबुली

0

लंडन: रिलायन्स कम्युनिकेशनचे प्रमुख अनिल अंबानी यांनी आपली आर्थिक परीस्थिती खालावल्याची कबुली दिली आहे. इंग्लंडमधील न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यावेळी अनिल अंबानी यांनी कबुली दिली. भारतीय टेलिकॉम क्षेत्रात झालेल्या उपथापालथीमुळे अनिल अंबानी यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले होते. चीनमधील बँकांच्या ६८ कोटी डॉलर ४ हजार ७६० कोटी रुपये कर्जाप्रकरणी लंडनमधील न्यायालयात सुनावणीदरम्यान अंबानी यांनी ही माहिती दिली.

चीनमधील तीन बँकांनी अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशनला ९२५. २० दशलक्ष डॉलर एवढे कर्ज दिले होते. कर्ज घेताना अनिल अंबानी यांनी वैयक्तिक हमी दिली होती. मात्र फेब्रुवारी २०१७ मध्ये त्यांची कंपनी कर्जभरणा करण्यात अपयशी ठरल्याने थकबाकीदार ठरली होती. अनिल अंबानी यांच्याकडे ११ आलिशान कार, एक खासगी विमान, एक यॉट आणि दक्षिण मुंबईतील महागड्या परिसरात पेंट हाऊस असल्याचा दावा बँकांच्या वकीलांनी केला. त्यानंतर अनिल अंबानी आपण वैयक्तिकरीत्या दिवाळखोर झाल्याचे सांगत आहेत.

दरम्यान, अडचणीच्या वेळी कुटुंबातल्या अन्य सदस्यांकडून मदत केली जात असल्याचे उदाहरण बँकांच्या वकिलांनी दिले. त्यावर अनिल अंबानींकडे आई कोकिलाबेन, पत्नी टीना अंबानी, मुलगे अनमोल आणि अंशुल यांच्या संपत्तीची आणि शेअर्सची काही माहिती नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला.