जळगाव। आगामी आर्थिक वर्षात राज्याच्या दरडोई उत्पन्नात 1 लाख 32 हजार 341 रुपयांवरून 1 लाख 47 हजार 399 रुपये वाढ अपेक्षित आहे. कृषी व सलग्न क्षेत्रात 12.5 टक्के , उद्योगक्षेत्रात 6.7 टक्के, तर सेवा क्षेत्रात 10.8 टक्के वाढ अपेक्षित असल्याचे सांगणारा आर्थिक पाहणी अहवाल आज विधीमंडळात सादर करण्यात आला. आगामी वर्षात स्थूल उत्पन्नात 9.4 टक्के वाढ अपेक्षित आहे. राज्याच्या महसूली जमेत गेल्यावर्षीच्या तुलनेत 11.4 टक्के वाढ अपेक्षित असून राज्यावरचे कर्ज 3 लाख 56 हजार 213 कोटी रुपयांवर गेलेले आहे.पाऊस चांगला झाल्याने ऊस वगळता इतर पिकांचे विक्रमी उत्पादन झाले आहे.
जलयुक्त शिवार योजनेची गती मंदावली
तृणधान्य 80 टक्के, कडधान्य 187 टक्के, तेलबिया 142 टक्के तर कापसाच्या उत्पादनात 83 टक्के वाढ अपेक्षित आहे. राज्य सरकारची महत्वकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार योजनेची गती मंदावली आहे.गेल्यावर्षीच्या तुलनेत जलयुक्त शिवार योजनेवर झालेला खर्च अतिशय कमी आहे या वर्षी मंजूर 1400 कोटींपैकी फक्त 85 कोटी रुपये जलयुक्त शिवार योजनेवर खर्च झाले. राज्यात 31 मार्च 2016 रोजी 4.99 कोटी सभासद असलेल्या 1.97 लाख सहकारी संस्था होत्या. त्यापैकी 11 कृषी पतपुरवठा, 11 टक्के बिगर कृषी पतपुरवठा तर 78 टक्के इतर संस्था आहेत एकूण 20.3 टक्के सहकारी संस्था तोट्यात आहेत त्यापैकी 29.2 % कृषी पतपुरवठा संस्था होत्या. राज्यातील सहकारी संस्थांमधील कर्जाची थकबाकी वर्ष 2014 मध्ये 1,33,064 कोटी होती 2015 मध्ये ती 1,44,748 तर 2016 मध्ये ही वाढून 1,51, 533 कोटी झाली.गेल्यावर्षीच्या तुलनेत कर्ज थकबाकी ही 4.7 टक्क्यांनी वाढली आहे राज्यात 2016 मध्ये 10 लाख 56 हजार लोकांनी 1254.97 कोटी रुपये कर्ज खाजगी सावकाराकडून घेतले आहे.