आर्थिक मलिदा लाटण्यासाठी भाजपने दिला वॉटरग्रेसला ठेका

0

मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांचा आरोप

जळगाव : मनपाने शहरातील सफाई आणि कचरा संकलनासाठी शिवसेनेचा विरोध असतानाही भाजपने वॉटरग्रेस कंपनीला ठेका दिला आहे. केवळ आर्थिक मलिदा लाटण्यासाठी भाजपने वॉटरग्रेसला ठेका दिला असल्याचा आरोप मनपा विरोधी पक्ष नेते सुनील महाजन यांनी पत्रकार परिषदेत केला. सध्या शहरात कचर्‍याची समस्या निर्माण झाली असून हे पाप भाजपचेच असल्याचे महाजन म्हणाले. दोन दिवसात स्वच्छतेचा प्रश्‍न मार्गी न लावल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे यांनी दिला.

जळगावकरांची दिशाभूल

शहरात साफसफाईचा ठेका देण्यासाठी आमदार राजूमामा भोळे यांनी मनपात येवून महासभेच्या आधी बैठक घेतली होती. सफाईचा ठेका वॉटरग्रेस कंपनीला देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. भाजपाच्या काही नगरसेवकांचा विरोध असतानाही आमदार भोळे यांनी हा ठेका वॉटरग्रेस कंपनीला देण्याचा ठराव महासभेत करून घेतला. सफाईचा ठेका रद्द करण्याचा अधिकार महासभेला असतांना आणि मनपात भाजपला स्पष्ट बहुमत असतांनाही आमदार भोळे हे विधानसभेत ठेका रद्द करण्याची मागणी करतात हे हास्यास्पद असून जळगावकरांची दिशाभूल करीत असल्याचेही महाजन म्हणाले.

..तर शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन- शरद तायडे

स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मनपा प्रशासनाने आठ दिवसांची मुदत दिली होती. लेखी आश्वासन देवूनही शहरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे दोन दिवसात शिवसेनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद तायडे यांनी दिली.