मुंबई: आज आर्थिक वर्षाचा पहिलाच दिवस आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराने नवा उच्चांक गाठला आहे. आज सकाळी १०.१८ वाजता सेन्सेक्सने नवा विक्रम प्रस्थापित केला. शेअर बाजाराने ३९ हजारांचा टप्पा गाठला आहे. मात्र सेन्सेक्सच्या अंकात घसरण झाली आहे. सेन्सेक्स ३८,८५९.८८ अंकावर थांबला. तर निफ्टीने ११.६६५.२० चा टप्पा गाठला आहे.
सेन्सेक्स १८५.९७ अंकांनी मजबूत होऊन ३८,८५९.८८ अंकांवर पोहोचला. ४१.३ अंकांच्या वाढीसह निफ्टीनेही ११,६६५.२० अंकाचा टप्पा गाठला. या पूर्वी ९ ऑगस्ट २०१८ रोजी सेन्सेक्सने पहिल्यांदा ३८ हजाराची उसळी घेतली होती. परदेशी गुंतवणूकदारांचा सकारात्मक प्रतिसाद आणि देशांतर्गत चलनाला आलेल्या मजबुतीमुळे सेन्सेक्सने उसळी घेतल्याचं सांगण्यात येतं. शेअर बाजारात टाटा मोटर्स, वेदांता लिमिटेड, टाटा स्टील, एलटी, आयसीआयसीआय बँक, एमअँडएम, भारती एअरटेल, एसीएल टेक, इन्फोसिस, हिरो मोटो कॉर्प,एसबायएन, मारुती टीसीएस, एशियन पेंट, हिंदूस्थान युनिलिव्हर, सन फार्मा, एचडीएफसी बँक, आयटीसी, बजाज ऑटो आणि रिलायन्सच्या शेअरांमध्ये तेजी होती. तर अॅक्सिस बँक, पॉवर ग्रीड, येस बँक, कोटक बँक, इंड्सइंड बँक, एनटीपीसी, कोल इंडिया, ओएनजीसीचे शेअर लाल निशाण्यावर होते.