आर्थिक शाखेकडून डीएसकेंच्या मालमत्ता खरेदी-विक्रीला रोख!

0

पुणे : ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात अपयश आल्यामुळे गुन्हे दाखल झालेले बांधकाम व्यावसायिक व डीएसके डेव्हलपर्स प्रा. लि. चे अध्यक्ष दीपक सखाराम कुलकर्णी (वय 68), त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी (वय 58) यांच्याविरोधात ठेवीदारांनी पुणे पोलिसांत तब्बल 945 तक्रारी दाखल केल्या आहेत. या प्रकरणाचा तपास करणार्‍या आर्थिक गुन्हे शाखेने राज्याचे नोंदणी महासंचालक (आयजीआर) यांना एक पत्र देऊन, डीएसकेंकडून कोणत्याही मालमत्तेची खरेदी अथवा विक्री होत असेल तर पुणे पोलिसांना पूर्वकल्पना द्यावी, असे सूचवले आहे. ठेवीदारांच्या हितरक्षणासाठी डीएसकेंच्या ताब्यातील मालमत्ता, भूखंड अथवा अपार्टमेंट यांच्या विक्रीवर पोलिसांनी रोख लावली आहे. सद्या डीएसके व हेमंती कुलकर्णी यांना मंगळवारपर्यंत विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी अटकपूर्व जामीन दिलेला असून, मंगळवारी डीएसकेंच्या अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे पुणेकरांसह हजारो ठेवीदारांचे लक्ष लागलेले आहे. कुलकर्णी दाम्पत्याला अटक करण्यासाठी पोलिस त्यांच्या अटकपूर्व जामिनाला विरोध करण्याची शक्यता आहे.

रविवारपर्यंत 30 कोटींच्या ठेवी अडकल्याचे स्पष्ट
आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने दैनिक जनशक्तिशी बोलताना सांगितले, की डीएसके उद्योग समूहाकडे मोठ्या प्रमाणात भूखंडांची मालकी आहे. यापैकी काही भूखंड विक्रीला काढण्याची शक्यता आहे. सद्या या प्रकरणाचा तपास सुरु असल्याने या उद्योग समूहाने कोणतीही मालमत्ता विकू नये, अशी तपास यंत्रणेची मागणी आहे. त्यानुसारच राज्याच्या नोंदणी महासंचालकांना पत्र लिहून डीएसके उद्योग समूहाच्या खरेदी-विक्रीचा कोणताही व्यवहार होत असल्यास पुणे पोलिसांना पूर्वकल्पना द्यावी; पोलिसांच्या अनुमतीशिवाय अशी नोंदणी करण्यात येवू नये, असेही नोंदणी महासंचालकांना कळविण्यात आलेले आहे. रविवारपर्यंत डीएसकेंच्याविरोधात एकूण 945 ठेवीदारांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या सर्व तक्रारींची शहानिशा केली जात आहे. तूर्त तरी एकूण 30 कोटींच्या ठेवी अडकल्या असल्याचे निदर्शनास आलेले आहे. हा आकडा वाढेल, अशी शक्यता वाटते, असेही या अधिकार्‍याने सांगितले.

बँक असोसिएशनलाही दिले व्यवहार रोखण्याचे पत्र
पुणे आर्थिक गुन्हे शाखा केवळ नोंदणी महासंचालकांनाच पत्र लिहून थांबलेली नाही तर त्यांनी भारतीय बँक असोसिएशनलादेखील पत्र पाठवून डीएसके उद्योग समूहाच्या कोणत्याही खात्यातून व्यवहार करण्यात येवू नयेत, अशी विनंती केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे रविवारपर्यंत एकूण 70 खाती शोधून ती गोठविण्याचे आदेश बँकांना दिले होते. त्यामुळे डीएसकेंची मोठी आर्थिक कोंडी पुणे पोलिसांनी केली आहे. कोथरूड येथील जितेंद्र नारायण मुळेकर (वय 65) यांच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीवरून पोलिसांनी सुरुवातीला कुलकर्णी दाम्पत्याविरुद्ध भादंविच्या 406, 420 आणि 34 कलमासह महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्यान्वये गुन्हे दाखल केले होते. या गुन्ह्यांत आणखी वाढ करण्यात आली असून, भारतीय दंडविधानाच्या 409 व 120 (ब) ही कलमेदेखील आता लावण्यात आलेली आहे. मंगळवारच्या सुनावणी विशेष न्यायालय डीएसकेंच्या अर्जावर काय निर्णय देते याकडे तपास यंत्रणासह पुणेकरांचेही लक्ष लागलेले आहे.