आर्थिक शिस्तीसाठी लेखा विभागाचा पुढाकार

0

मुख्य लेखापालांचे परिपत्रक जारी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेला आर्थिक शिस्त लावण्यासाठी लेखा विभागाने पुढाकार घेतला आहे. अधिकारी व अभियंत्याच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी लेखा विभागाने ‘चेक लिस्ट’ तयार केली आहे. सर्व प्रकारच्या भांडवली, महसुली कामांची बिले चेक लिस्टचा आधार घेऊनच लेखा विभागाकडे सादर करावीत, असे परिपत्रक महापालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे यांनी जारी केले आहे.

बिलांमध्ये सुसूत्रता येण्यासाठी
महापालिकेचे अंदाजपत्रक सुमारे पाच हजार कोटी रुपयांचे आहे. भांडवली कामांवर दीड हजार कोटी तर महसुली कामांवर एक हजार कोटी रुपये खर्ची पडतील असे नियोजन आहे. महापालिकेच्या विविध विभागांमार्फत विकास कामे, देखभाल-दुरुस्तीची कामे, वस्तू व सेवा खरेदीची बिले अदायगीसाठी लेखा विभागाकडे सादर होतात. मुख्य लेखापालांच्या अंतिम मान्यतेनंतरच ठेकेदार व पुरवठादारांना बिले अदा केली जातात. मात्र, या बिलांमधील अनेक बाबी शंकेला वाव घेणार्‍या असतात. त्यामुळे बिले अदा करताना मोठा विलंब होतो. बील सादरीकरणात सुसूत्रता यावी, बिले अचुक आणि परिपुर्ण व्हावीत यासाठी लेखा विभागाने सुधारित चेक लिस्ट जारी केली आहे.

कामाची प्रशासकीय मान्यता, सुधारित प्रशासकीय मान्यता, कार्यादेशाची तारीख, अतिरिक्त कामावर झालेला खर्च, सुधारित वित्तीय मान्यता, कामाची मुदत, मुदतवाढ आदेश अशी अनेक आवश्यक कागदपत्रे जोडली जात नसल्याने, ही बिले तपासून मंजुर करताना लेखा विभागाला अनेक अडचणींचा सामना करावा लागायचा. याकरिता संबंधित विभागप्रमुख अथवा सक्षम अधिकार्‍याकडे बिलाची फाईल पुन्हा पाठवावी लागत असे.

सुधारित चेक लिस्ट जाहिर
महापालिकेच्या आर्थिक कारभाराला शिस्त लावण्यासाठी मुख्य लेखापाल राजेश लांडे यांनी लेखा विभागाला बिले सादर करताना सुधारित चेक लिस्ट जाहिर केली आहे. त्यानुसार ही बिले सादर करण्याच्या सुचना प्रत्येक विभागाला देण्यात आल्या आहेत. या चेक लिस्टनुसार, भांडवली बिले सादर करताना त्यामध्ये प्रशासकीय मान्यता, सुधारित प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता, सुधारित तांत्रिक मान्यता, कार्यादेश, एक्स्ट्रा आयटम मान्यता आदेश क्रमांक, त्यावर केलेला खर्च, वित्तीय मान्यता, सुधारित वित्तीय मान्यता, कामाची मुदत, मुदतवाढ आदेश आणि काम पुर्णत्वाच्या दाखल्याचा जावक क्रमांक व दिनांक या बाबींचा समावेश केला आहे.

याशिवाय या बिलांची तपासणी करताना कामासाठी एकूण उपलब्ध तरतुद, मंजूर निविदा रक्कम, मंजूर निविदा रकमेच्या आत खर्च होत असल्याची खातरजमा केली आहे की नाही, देयकासह झालेला खर्च, आगाऊ दिलेली रक्कम, निविदेत मजुरांवर दाखविलेला खर्च, देयकामधील विविध घटकांवर खर्च केलेली रक्कम, सुरक्षा ठेव रक्कम, रकमेचा कालावधी, कामाच्या आदेशात नमूद केलेल्या कंत्राटदाराचे नाव, देयक प्रदान करावयाच्या कंत्राटदाराचे नाव, पॅनकाकर्डवरील कंत्राटदाराचे नाव, वीमा काढल्याचा दिनांक, त्याचा कालावधी, तपासणी दाखला अशा अनेक बारिकसारिक बाबींचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय महसूली कामांच्या बिलांसाठी रॉयल्टी, प्राप्तीकर, अनामत रक्कम, दंड, एलबीटी सेवा कर, इतर कर या बाबींचा समावेश करण्यात आला आहे.