नेरुळ । खारघर येथील खारघर फोरम संघटनेच्या सदस्यांनी डोंगराला लागलेल्या आगीतून 500 झाडे जळण्यापासून वाचवली. डोंगराला वणवा लावण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. रविवारी दुपारी एका अज्ञाताने खारघर हिल या डोंगरावर असलेल्या गवताला आग लावली. गवतानी पेट घेऊन आग वार्यामुळे आणखीनच पसरली. काही अंतरावरच पावसाळ्यात वृक्षारोपण केलेली 500 झाडे होती. या आगीत काही झाडे जळून खाक झाली असली, तरी खारघर फोरमच्या सदस्यांनी तातडीने मातीचा शिडकावा करत आग विझवण्याचा प्रयत्न केला, तर कर्तव्यदक्ष खारघर फोरम आणि ग्रीन आर्मीच्या सदस्यासह, वन विभाग आणि अग्निशमन दलाच्या जवानांना सांगून आग आटोक्यात आणण्याची मोलाची कामगिरी केली.
फोरमने लागवड केलेली झाडे आगीपासून वाचवण्यासाठी फोरमच्या सदस्यानी शर्थीचे प्रयत्न केले. सर्व झाडे सुरक्षित राखण्यात यश आल्याचे फोरम सदस्यांनी सांगितले. आगीची तिव्रता मोठी असल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानानी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. मात्र मोठ्या प्रमाणात धुरामुळे वातावरण मात्र धुरकट झाले होते.