जळगाव प्रतिनिधी । येथील आर्या फाऊंडेशनतर्फे केरळमधील पूरग्रस्तांसाठी ८ टन जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठविण्यात आली आहे.
आर्या फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या मित्रपरिवाराला केरळ पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले होते, त्याला प्रतिसाद देत अनेकांनी धनादेशाद्वारे मदत पाठवली, तर काहींनी जीवनावश्यक साहित्य दिले. मदतीचे सर्व साहित्य नाशिक रेल्वे स्थानकावरून पाठवण्यात आले. आर्या फाउंडेशनचे नाशिक जिल्हा समन्वयक ऋषिकेश परमार यांनी बरेच साहित्य नाशिक येथून डॉ. पाटील यांच्या सूचनेनुसार खरेदी केले. नाशिक रेल्वे स्थानकावर हे साहित्य उतरवणे आणि रेल्वेत चढवण्यासाठी जवानांनी सहाय्य केले. जीवनावश्यक साहित्य, औषधी आदींचा समावेश आहे. ही मदत कोची येथील जिल्हाधिकारी यांच्या नावे पाठवण्यात आली आहे. मदतनिधी व जीवनावश्यक साहित्य जमा करण्यासाठी आर्या फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पाटील यांच्यासह सचिव डॉ. राहुल महाले, खजिनदार शलाका पाटील, डॉ. राहुल महाजन, डॉ. जितेंद्र मोरे, रवींद्र पाटील, ऋषिकेश परमार, अक्षय भावसार यांनी प्रयत्न केले.