धुळे । गैरहजर राहणे, कामाबाबत दिरंगाई, संपर्क न साधणे ही कारणे भोवल्याने तालुक्यातील आर्वी व धाडरे येथील तलाठ्यांना प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. आर्वीचे तलाठी मोहन पगार व धाडरे च्या तलाठी व्ही.व्ही.फुलपगारे यांना निलंबन काळात मुख्यालय म्हणून धुळे ग्रामीण तहसील कार्यालय देण्यात आले आहे. पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे. आर्वी येथे 15 नोव्हेंबर रोजी दप्तर तपासणीवेळी अनेक गंभीर मुद्दे आढळले होते. त्यात वसुलीच्या पावतीवर दिनांकाचा उल्लेख नसणे, वसुली करूनही भरणा न करणे, फेरफार नोंदी प्रलंबित असणे आदी बाबींचा समावेश होता. तर धाडरेचे तलाठी फुलपगारे यांच्यासंदर्भातही कामात हलगर्जीपणा, दिरंगाई, टाळाटाळ यासह सूचना देऊनही सुधारणा न करणे आदी कारणांचा समावेश आहे. त्यामुळे ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.