जळगाव: परिवर्तन साहित्य अभिवाचन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आर. आर. महाविद्यालय शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘श्यामची आई’ आणि विद्या इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘भूगोलाचा तास आणि त्सुनामी’, दुष्काळ व पवनचक्की’ हे अभिवाचन सादर केले. त्यांच्या सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली. अभिवाचनात विद्या इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जगप्रसिद्ध अशा टिली स्मिथ व पवन चक्की बनवणाऱ्या विल्यमची गोष्ट सादर केली. थायलंडच्या किनाऱ्यावर आलेल्या त्सुनामीपासून हजारो पर्यटकांना वाचवणारी टिलीला वर्गात भूगोलाच्या शिक्षकांनी त्सुनामी विषयी शिकवलं होत आणि आपण जे शिकतो त्याचा आपल्या जीवनात उपयोग करता येऊ शकतो हे टिलीने थायलंडच्या समुद्रकिनाऱ्यावरील हजारो पर्यटकांचा जीव वाचवून सिद्ध केले.
आर. आर. शाळेच्या विद्यार्थ्यांनी सानेगुरूजी लिखित ‘श्यामची आई’ हे अभिवाचन तन्मय तिने सादर केला. उत्तम संवाद, सहज सुंदर अभिनय, देखणं नेपथ्य, प्रभावी प्रकाशयोजना आणि पूरक पार्श्वसंगीत या बळावर पुस्तकातले शब्द विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याने महोत्सवात सादर केले. दर्शन पाटील, दीपक पाटील, मामुनी मायती, खुशी सिंधी, कल्याणी महाजन , रिमझिम शर्मा, देवयानी जाधव हे विद्या इंग्लिश शाळेच्या विद्यार्थी तर आर. आर. शाळेचे महेश पाटील, आदित्य दहिभाते, कौस्तुभ पवार, ओम पवार, प्रथमेश खडके, शलाका कानगो, प्रेरणा लाडवंजारी, जयश्री कुंभार यांनी अभिवाचनात सहभाग घेतला. या वेळी रेखा महाजन, माधवी थत्ते, विजया शिवराम पाटील, बिना मलारा ,मंजूषा भिडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता वसंत आबाजी डहाकेंच्या कविता सादर केल्या जाणार अाहेत.