नागपूर : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, अॅड. उज्वल निकम यांच्यासह अनेक मान्यवर व लाखो विद्यार्थ्यांना घडविणार्या ईस्ट खानदेश एज्युकेशन सोसायटीच्या ‘आरआर’ अर्थात रावसाहेब रुपचंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या अध्यक्षांवर केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आढळल्याने योग्य बाबी तपासून संस्थेवर प्रशासक नेमणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत दिली. संस्थाचालकाकडून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचा होणार मानसिक छळ व मनमानी कारभाराच्या विरोधात आ. स्मिताताई वाघ यांनी विधानपरिषदेत संबंधित विद्यालयाच्या अध्यक्षांवर कारवाई करण्यासंबंधी लक्षवेधी उपस्थित केली.
-काय आहेत अध्यक्षांवर आरोप
आर आर विद्यालयातील शिक्षक व शिक्षतेकर कर्मचार्यांना संस्थेच्या अध्यक्षांकडून मानसिक छळाचा वारंवार सामना करावा लागत आहे. अध्यक्ष अरविंद लाठी हे शिक्षकांना जातीवाचक शिवीगाळ व अपमानास्पद वागणूक देत आहेत. तसेच सर्व आर्थिक व्यवहार स्वतःच्या ताब्यात ठेवणे, शालेय समित्यांच्या सभा हेतूपरस्पर सुट्टीच्या दिवशी ठेवून कर्मचार्यांना वेठीस धरणे, संस्थेत विविध कार्यक्रमांच्या वेळी शिक्षकांना रात्री उशिरपर्यंत थांबवून त्यांच्याकडून बाक उचलून घेणे, साफसफाई करण्यासारखी अशोभनीय कामे शिक्षकांकडून करवून घेणे, सेवानिवृत्त पर्यवेक्षक व विद्यमान उपमुख्याध्यापिका यांची विनाकारण वेतनवाढ रोखण्याची कार्यवाही करणे, शिक्षकांची महत्वाची कामे असताना त्यांनी रजा मागितल्यास ती नाकारणे, शिक्षकांनी हुज्जत घातल्यास त्यांना दादागिरीच्या भाषेत धमक्या देणे असे प्रकार अध्यक्ष अरविंद लाठी हे वारंवार करत असल्याचे आरोप आमदार स्मिताताई वाघ यांनी विधानपरिषदेत केले.
जळगावच्या सदर शाळेचा विषय गंभीर आहे. याची चौकशी करण्यात आली असून संबधित दोषी असल्याचे तथ्य समोर आले आहे. लवकरच अधिकची चौकशी करून संस्थेवर प्रशासक नेमण्याची कारवाई केली जाईल.
विनोद तावडे, शिक्षणमंत्री
शिक्षकांवर अन्याय होत असल्याने बहुतांश शिक्षक रक्तदाब तसेच मधुमेह इत्यादी आजारांनी त्रस्त होत आहेत. यामुळे शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांमध्ये असंतोष पसरला आहे. मी स्वतः या शाळेची विद्यार्थिनी असून हा प्रकार निंदनीय असून संस्थेचे अध्यक्षांवर कारवाई करण्याची मागणी शासनाकडे केली आहे. याची शासनाने दखल घेतली असून लवकरच कारवाई होणार आहे.
स्मिताताई वाघ, आमदार.