शिरपूर । येथील आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचलित आर.सी.पटेल सिनिअर कॉलेजच्या दोन विद्यार्थिनींनी क्रीडा क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. नेहा रमेश कोळी हिची महाराष्ट्र फुटबॉल संघात निवड झाली आहे तर चेतस्विनी पोलादसिंग राजपूत या विद्यार्थीनीने राष्ट्रीय स्तरावर महिलांच्या क्रिकेटच्या वेस्ट झोन संघात स्थान पटकावले आहे. नेहा आणि चेतस्विनीच्या निवडीने शिरपुरच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे. यशाबद्दल आ.अमरिशभाई पटेल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, झोनल सचिव प्रमोद क्षिरे, क्रीडा विभाग प्रमुख प्रितेश पटेल, संस्थेचे सीईओ डॉ.उमेश शर्मा, कॉलेजचे प्राचार्य डॉ.डी.आर.पाटील, संजय जगताप, रईस काझी, व सर्व संचालक मंडळाने कौतुक केले. तिला प्रशिक्षक फिरोज शेख, राकेश बोरसे व संदिप देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.
नेहा कोळी राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना
नेहा कोळी हिची महाराष्ट्र फुटबॉल संघात निवड झाली असून पंजाब येथे 15 मे पासून होणा-या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी ती मुंबई येथून महाराष्ट्र संघासोबत रवाना झाली आहे. तिच्या या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. आर.सी.पटेल सिनिअर कॉलेजमध्ये प्रथम वर्षे मध्ये शिकणा-या नेहा रमेश कोळी हिने आतापर्यंत फुटबॉल खेळात अतिशय चांगल्या पद्धतीने खेळाचे प्रदर्शन केले असून तिची राष्ट्रीय फुटबॉल संघासाठी निवड चाचणीसाठी निवड झाली आहे. धुळे जिल्हयातून राष्ट्रीय फुटबॉल निवड चाचणीसाठी पात्र ठरलेली ती एकमेव विद्यार्थिनी आहे. प्रशिक्षक मोहम्म्द शफीक व प्रशिक्षक अयाज अहमद, क्रीडा शिक्षक भूषण चव्हाण यांचे तिला मार्गदर्शन लाभले.
यष्टीरक्षकाच्या भूमिकेत खेळणार चेतस्विनी
शिरपूर येथील आर. सी. पटेल सिनिअर कॉलेजची विद्यार्थिनी चेतस्विनी पोलादसिंग राजपूत या विद्यार्थीनीने राष्ट्रीय स्तरावर महिलांच्या वेस्ट झोन संघात स्थान पटकावले आहे. या संघात ती यष्टीरक्षकाच्या भूमिकेत खेळणार आहे. सदर संघाचा कँप दि. 20 मे ते 8 जून या कालावधीत राजकोट येथे होणार आहे. अभिमानाची बाब म्हणजे या संघात महाराष्टातील केवळ 4 खेळाडू मुलींची निवड करण्यात आली असून चेतस्विनी हिने हे यश प्राप्त केले आहे. चेतस्विनीने सलग चार वेळेस धुळे जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्राचे नेतृत्व केले आहे. तिला प्रशिक्षक फिरोज शेख, राकेश बोरसे व संदिप देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.