शिरपूर । सोशल मिडीयाचा जगभर वापर होत असतांना तरूणांबरोबर आता प्राथमिक शाळेत शिकणार्या चिमुकल्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी. अशी संकल्पना शिरपूर येथील आर सी पटेल प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी व्यक्त केली आहे. प्रत्येक पालक र्स्मार्ट मोबाईल फोनचा वापर करतात. तर पाच ते दहा वयोगटाची शाळकरी मुलांना देखील आता मोबाईल फोनची चांगली जाण असल्याचे दिसून येते. मुलांनी मोबाईल फोनचा योग्य वापर करावा यासाठी येथील मुख्याध्यापक गणेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी एक शक्कल लढवली. ती म्हणजे पालकांचा व्हट्सअप गृप तयार करून विद्यार्थ्यांच्या शाळेतील कलाकृती,स्पर्धा,खेळ,विविध उपक्रम तसेच विद्यार्थ्यांसाठी ऑन लाईन टेस्ट या गृपच्या माध्यमातून सुरू करून प्राथमिक शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना सोशल मिडीयाची ओळख व्हावी या विचाराने शिक्षकांनी हा स्तुत्य उपक्रम राबवला आहे.
विद्यार्थ्यांची ऑनलाईन टेस्ट
विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परिक्षांसाठी ऑनलाईन परिक्षा घेतली जाते. त्यानुसार येथील प्राथमिक शाळेत शिकणार्या इय्यत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परिक्षेचा सराव आतापासुनच व्हावा यासाठी येथील शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातून एकदा ऑनलाईन टेस्ट घेण्याचा उपक्रम राबवला आहे. या ऑनलाईन टेस्टची लिंक शिक्षकांनी तयार केलेल्या पालकांच्या व्हाट्सअप गृप वर टाकली जाते. आणि घरी विद्यार्थी ती लिंक ओपन करून प्रश्नपत्रिका सोडवतात. या स्तुत्य उपक्रमासाठी सी.डी.पाटील, महेंद्र माळी, तर एच आर पटेल कन्या शाळेतील मुख्याध्यापकांसह येथील शिक्षक मिनल माळी,लालसिंग राजपूत, कविता पाटील,संजय पटेल,लक्ष्मण साळुंखे,चंद्रकांत सोनवणे, उज्वला पाटील, लोहार ,संदीप पाटील,अरविंद राजपूत,श्रीमती सोनार, योजना पाटील, योगीता शुक्ल, आदी कामकाज पाहात आहेत.
कलाकृतींची माहिती व्हट्सअप गृपवर
प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथी इयत्तेत शिकणार्या विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा तसेच शाळेत राबवले जाणारे विविध उपक्रम,खेळ,स्पर्धा याची माहिती पालकांना व्हावी म्हणून शिक्षकांनी सोशल मिडीयाचा योग्य वापर करून पालकांचा व्हट्स अप गृप तयार केला आहे. या व्हाट्सअपगृपवर विद्यार्थ्यासाठी शाळेत राबवले जाणारे उपक्रमाची संपुर्ण माहिती टाकली जाते. त्यामुळे आपली मुले शाळेत काय शिकतात आणि शिक्षक काय शिकवतात याची माहिती विद्यार्थ्यांच्या प्रगतीवरून पालकांना घरबसल्या कळते.
पालक व शिक्षक यांचा व्हाट्सअपगृप तयार केल्याने घरबसल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतिची माहिती पालकांना कळते. त्याचबरोबर ऑनलाईन टेस्टमुळे विद्यार्थी व पालक यांना लगेच मार्क कळतात व ऑनलाईन परिक्षेचा सराव होतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणात करणे काळाची गरज आहे.
– मुख्याध्यापक गणेश साळुंके