मावळ । ढोल ताशांचा निनाद..आणि गणपती बाप्पा मोरया..मंगलमुर्ती मोरया…चा नामघोष, अशा भक्तीमय आणि उत्साही वातावरणात शुक्रवारी मावळ, खेड तालुक्यात गणरायाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. गणेशाच्या स्वागतासाठी पावसानेही हजेरी लावली होती. त्यामुळे रिक्षा, टेम्पो, आणि चारचाकी वाहनातून गणरायाला घरी नेण्यात आले. चाकण, देहूरोड, तळेगाव, लोणावळ्यात रात्री उशिरापर्यंत श्रींच्या आगमनाच्या मिरवणुका सुरू होत्या. शहरातील मंडळांनी सकाळपासूनच श्रींची प्रतिष्ठापना करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे संपूर्ण वातावरण बाप्पामय झाले होते.
प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त साधण्यासाठी सर्वांची धावपळ
देहूरोडमध्येही उत्सहाला उधाण आले होते. लाडक्या गणेशाला घरी नेण्यासाठी भाविकांची सकाळपासूनच लगबग सुरू झाली होती. बाजारपेठेत अनेक वर्षांपासून गणेशमुर्ती विक्री करणारे सुनिल व्यवहारे यांच्या कला केंद्रातून सकाळी 7 वाजता पहिली गणेशमुर्ती विक्री झाली. पहाटे 5.30 पासूनच हारफुले, केवडा, दुर्वा, नारळ, अगरबत्ती, धुपबत्ती, अत्तर आदी सुगंधी द्रव्ये तसेच पुजा साहित्याची दुकाने थाटण्यास सुरुवात झाली होती. गणेशस्थापनेचा मुहूर्त दुपारपर्यंतच असल्यामुळे सकाळपासूनच गणेशाच्या मुर्ती घरी नेल्या जात होत्या. वेळेत प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न दिसत होते. मुहूर्त साधण्यासाठी धावपळ सुरू होती. पावसाने हजेरी लावल्याने रिक्षा, टेम्पो आणि चारचाकी वाहनांतून बाप्पाला नेण्यावर गणेशभक्तांचा जोर दिसून आला. पांढरे रुमाल, लाकडी पाट, विविध प्रकारची फळे, नाविन्यपुर्ण हार, मखर, सजावटीचे साहित्य, घंटा, विविध प्रकारांतील मोदक आदी साहित्य खरेदीसाठी लगबग दिसत होती. पावसामुळे यंदा वाजंत्र्यांची उपस्थिती दिसत नव्हती.
मंडळांनी साधला सायंकाळचा मुहूर्त
देहूरोडमधील मानाचा गणपती म्हणून परिचित असलेल्या शिवस्मारक गणपतीची प्राणप्रतिष्ठापना सकाळी 11 च्या सुमारास करण्यात आली. यावेळी समितीचे अध्यक्ष दत्तात्रय तरस, अॅड. कृष्णा दाभोळे, तुकाराम दाभोळेे आणि दाभोळे कुटुंबिय उपस्थित होते. सार्वजनिक गणेश मंडळांपैकी बहुतांश मंडळांनी सायंकाळी प्रतिष्ठापना केली. अखिल मंडई मंडळाने सकाळी 11.30 चा मुहूर्त साधला. मंडळाचे अध्यक्ष बिट्टु लांगे, महेंद्र सरोदे, अरुण सरोदे, उमेश जैन यावेळी उपस्थित होते. नवशक्ती चैतन्य मित्र मंडळाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना सायंकाळी 5.30 वाजता झाली. मंडळाचे अध्यक्ष दिनेश श्रीवास, अजय लांगे, अतुल लांगे, बाळासाहेब फाले, नकुल फाले, संदिप लांगे, सुनिल लांगे, विजय लांगे, मल्लेश हेगडे, किरण भारस्कर, अॅड. कृष्णा दाभोळे आदी उपस्थित होते. सुदर्शन मंडळाच्या गणेशाची प्रतिष्ठापनाही सायंकाळी 5.30 वाजता झाली. मंडळाचे अध्यक्ष विशाल खंडेलवाल, सुनिल गोयल, गिरीराज शर्मा, सचिन खंडेलवाल, आकाश गुप्ता, सनी खंडेलवाल आदी उपस्थित होते.
पावसातही उत्साहाला उधाण
आराध्य दैवत असलेल्या गणरायाचे स्वागत करण्यासाठी जणू आकाशातून वरूणराजही जलधारांच्या रूपाने खाली आला होता. पावसामुळे देहूरोड बाजारपेठेतील गर्दीवर चांगलेच परिणाम दिसत होते. पण अधूनमधून पावसाचा ओघ कमी होताच अचानक गर्दी उसळत होती. बालगोपाळ तर चिंब भिजत गणपती बाप्पा.. मोरया अशा आरोळ्या देत होते. अनेकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला गरी नेण्यासाठी मोठी वाहने आणली होती. त्यामुळे सकाळपासूनच महामार्ग आणि स्वामी विवेकानंद चौक वाहनांच्या पार्किंगने जाम झाला होता. त्यामुळे काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, कार्यकर्तेच वाहतूक नियमन करून कोंडी कमी करण्याचे प्रयत्न करताना दिसत होते.
घराघरात गणराज विराजमान
ढोल-लेझीम, झांज, हलगी, ढोल-ताशांचा कडकडाट, सनईचा सुमधूर स्वर, गुलालाची मुक्त उधळण अशा जल्लोषमय वातावरणात चाकण शहर व परिसरातील गावांमध्ये तसेच औद्योगिक कारखान्यांमध्ये शुक्रवारी गणेशाचे स्वागत झाले. मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने घराघरात गणपती विराजमान झाले. रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या. शहरातील मंडळांनी सकाळपासूनच श्रींची प्रतिष्ठापना करण्यास सुरूवात केली होती.
लोणावळ्याची बाजारपेठ गजबजली
सकाळपासूनच लोणावळा शहरातील मुख्य बाजारपेठ गजबजून गेली होती. मात्र त्याचवेळी पावसाने हजेरी लावत शहराला झोडपून काढले. यामुळे सर्वांच्या उत्साहावर पाणी फेरले गेले. त्यामुळे गणेशाच्या स्वागतासाठी केलेला सर्व व्यवस्था बाजूला ठेऊन पावसाच्या पाण्यापासून गणेश मूर्तीचा बचाव करून घरापर्यंत तसेच मंडळाच्या मंडपापर्यंत घेऊन जाण्याची धडपड करताना नागरिक आणि गणेश मंडळाचे कार्यकर्ते करताना दिसून येत होते.
तळेगावात दुपारनंतर निघाल्या मिरवणुका
जोरदार पाऊस असतानाही तळेगाव दाभाडे येथील गणरायांचे आगमन अतिशय उत्साहाने आणि आनंदाने भक्तिमय वातावरणात झाले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी दुपारनंतर वाजत-गाजत मिरवणुका काढून गणरायांच्या प्राणप्रतिष्ठापना केल्या. तळेगाव शहरातील राजेंद्र चौक, शाळा चौक, मारुती मंदिर चौक तसेच तळेगाव स्टेशन शुभम कॉम्पलेक्स, मनोहर नगर, यशवंत नगर, स्वराज्यनगरी या भागात गणरायांच्या पुजेची दुकाने आणि पूजा साहित्य विक्री करणार्यांनी मोठी गर्दी केली होती. बहुतेक सार्वजनिक मंडळांनी सायंकाळी 7 नंतर प्रतिष्ठापना केली. गल्लोगल्ली गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष चालला होता. शहरात विविध मंडळाच्या माध्यमातून आरतीचे कार्यक्रम झाले.
रस्ते गर्दीने फुलले
लाडक्या गणरायाच्या आगमनाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. उत्कंठा, लगबग आणि उत्साह सर्वत्र दिसून येत होता. शनिवारपासूनच शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या होत्या. चाकण शहर भागात श्री ची मूर्ती, हार, फुले, सजावटीचे साहित्य, मोदक पेढे व पूजेचे साहित्य खरेदीचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसत होता. शहराच्या बहुतांश भागात गणरायाच्या मूर्ती विक्रीची दालने थाटण्यात आली होती. 150 रुपयापांसून ते 25 हजारापर्यंत मूर्तींचे दर होते. गणरायाला घरी नेण्यासाठी सकाळपासून भक्तांनी गर्दी केली होती. शहराच्या प्रत्येक भागात गर्दी दिसून येत होती. गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया च्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता.
आळंदीत डीजेमुक्त गणेशोत्सव
प्रदूषण टाळण्यासाठी यावर्षी आळंदी परिसरातील गणेशोत्सव डीजेमुक्त साजरा करण्यात येत आहे. वाढत्या ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी डीजेचा वापर टाळून पारंपरिक ढोल वाद्यांचा वापर करण्याचे आवाहन सार्वजनिक गणेश मंडळांनी स्वीकारले आहे. या उपक्रमाचे आळंदीत स्वागत करण्यात आले. आळंदी परिसरातील गणेशोत्सवाचे नियोजन करण्यासाठी पोलीस आणि शांतता कमिटीची नुकतीच बैठक झाली. येथील जय गणेश प्रतिष्ठान, शिवतेज मित्र मंडळ, शिवस्मृती प्रतिष्ठान, अखिल भाजी मंडई मंडळ, हनुमान मित्र मंडळ, ज्ञानराज मित्र मंडळ, पद्मावती मित्र मंडळ, नवशिवशक्ती मित्र मंडळ, शिवराज मित्र मंडळ, न्यू अमरज्योत मित्र मंडळ, राजे शिवछत्रपती मित्र मंडळ आदी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात बाप्पा विराजमान आले. धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत आळंदी परिसरात गणेशोत्सवाला आनंदात सुरुवात झाली.
माउली मंदिरात श्रींचे आगमन
बाप्पा मोरया अशा जयघोषात ढोल ताशा, टाळ-मृदंग, वीणेच्या त्रिनादात प्रथा परंपरांचे पालन करत माउली मंदिरासह आळंदी परिसरात श्रींचे आगमन झाले. माउली मंदिरातील पुरातन श्री गणेश मंदिरात श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. विविध धार्मिक कार्यक्रम, अभिशेक, पूजा, भाविकांचे दर्शन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मठ, मंदिरे, सार्वजनिक मंडळे, धर्मशाळा, शाळांमध्येदेखील गणरायांची प्रतिष्ठापना करण्यात आली. वारकरी संप्रदायातील विविध धर्मशाळा, वारकरी शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणारे बाल वारकरी यांनी दिंडी काढून सहभाग नोंदविला.