नवी दिल्ली : सीबीआयच्या दोन अधिकाऱ्यांमधील लाचखोरीच्या प्रकरणामुळे सध्या दिल्लीतील वातावरण तापलेले आहे. याच प्रकरणावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे, असे असतांना आलोक वर्मा यांच्या घरातून बंदी बनविलेल्या एका काम करणाऱ्या युवतीला पोलीस आणि महिला आयोगाने सुटका केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, दिल्ली पोलिसांसह महिला आयोगानेही याबाबत गुप्तता पाळली आहे.
आलोक वर्मा यांनी आपल्या वसंत विहार येथील एका सदनिकेमध्ये घरकाम करण्यासाठी सुनिता टोम्पो या 20 वर्षांच्या मांडरच्या तरुणीला डांबून ठेवले होते. तिला गेल्या तिन महिन्यांपासून घरकामाचे पैसे दिले जात नव्हते, तसचे घरीही जाऊ दिले जात नव्हते.
सुनिता ही मांडरच्या नारो सरना गावातील राहणारी आहे. तीन महिन्यांपूर्वी तिला एका ओळखीच्या महिलेने संत नगरमध्ये प्लेसमेंट एजन्सीचालविणाऱ्या यमुना आणि अशोक यांना विकण्यात आले होते. या दोघांनी आलोक वर्मा यांच्या सदनिकेमध्ये घरकाम करण्यासाठी ठेवले होते. कामाच्या बदल्यात जे पैसे मिळत होते, ते यमुना आणि अशोक घेत होते, अशी माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी सुनिताला महिला सुधारगृहामध्ये पाठविले आहे.